मक़सूद अली
यवतमाल:- आज दिनांक २६ मार्च २०१८ रोजी विधान भवन येथे मा. उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद श्री माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील साखर उद्योगासमोरील समस्यांबाबत शासन व राज्यातील प्रमुख नेते तसेच साखर कारखानदार यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदर बैठकीत राज्यातील उस उत्पादक शेतकरी व साखर उत्पादक कारखानदार यांच्या समोरील विविध समस्यांबाबत सर्व पक्षीय नेत्यांनी चर्चा केली. सदर समस्या राज्य सरकार व यथावश्यक केंद्र सरकार यांच्या निदर्शनास आणून त्यावर सकारात्मक निर्णय होण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी राज्यातील सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री मा. श्री. सुभाष देशमुख यांनी दिले. सहकार क्षेत्र व साखर उद्योगासंदर्भातील ग्रामीण भागातील समस्यांबाबत यावेळी मा. ग्राम विकास मंत्री श्रीमती पंकाजाताई मुंडे यांच्या समक्ष मा. विरोधी पक्ष नेते श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मा. अजितदादा पवार यांनी आपली मते मांडली व राज्यातील विविध भागातील साखर उद्योगासमोरील समस्यांचे निवारण करण्यासाठी उपाय सुचविण्यात आले व त्या संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.याप्रसंगी मा. उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद श्री माणिकराव ठाकरे यांनी "जयकिसान सहकारी साखर कारखाना मर्या., बोदेगाव, ता. दारव्हा, जि. यवतमाळ संदर्भातील प्रश्न यावेळी सदर बैठकीत उपस्थित केला. वाशीम व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी व सदर कारखाना बंद असल्यामुळे बेरोजगार झालेले कामगार यांच्या समस्या यावेळी मा. उपसभापती महोदयांनी मा. सहकार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. दोन्ही जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जवळच कारखाना असणे अत्यंत गरजेचे असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था व नजीक कारखाना असण्याची गरज पाहता सदराचा कारखाना त्याच जागेवर चालविण्याच्या अटीवर लिलाव/विक्री करणे आवश्यक असून इतर ठिकाणी कारखाना हलविण्यात येवू नये असे सांगितले तसेच सध्या सदर कारखान्याचा ताबा "महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे' असल्यामुळे त्या बँकेतील अधिकाऱ्यांची या विषयासंदर्भात बैठक आयोजित करून या विषयी तोडगा काढण्यात यावा, अशी सूचना मा. उपसभापती महोदयांच्या वतीने करण्यात आली व त्याला मा. सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री महोदयांनी सकारत्मक प्रतिसाद देत लवकरच सदर विषयासंदर्भात बैठकीचे आयोजन करून ह्या विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
