सैय्यद मुजीबोद्दीन
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची कारवाई-
यवतमाळ दि. 01 : जिल्ह्यातील अवैध सावकारी मोडून काढण्यासाठी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तथा संबंधीत तालुक्याचे सहनिबंधक कार्यालयाने कारवाईचा धडाका लावला आहे. यवतमाळ, उमरखेड येथील तक्रारीनंतर आता घाटंजी येथील अवैध सावकारावर धाड टाकून अवैध सावकारीबाबत धनादेश, वचनचिठ्ठी व इतर महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहे.घाटंजी येथील गुरुदेव वार्डात वास्तव्य असलेले मंगेश नारायण पुरी (48) हे अवैध सावकारी करीत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. या अनुषंगाने तपासणी पथकाने त्यांच्या राहत्या घरी धाड टाकली. यात त्यांच्या घरामधून अवैध सावकारीबाबत धनादेश, वचनचिठ्ठी, शेतीची सौदे पत्र, उसनवार चिठ्ठी आदी आक्षेपार्ह 23 कागदपत्रे आढळून आली. ही सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली असून पडताळणीमध्ये मंगेश पुरी हे अवैध सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
अवैध सावकारीबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने सहकार विभागाने अवैध सावकारी करणाऱ्यांवर त्वरीत धाड टाकून तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई जी.एन.नाईक, सतीश डोंगरे, एम.डी.मेश्राम, सहकार अधिकारी बी.के.कुळमेथे, अमोल इंगोले, संध्या पालकर, वर्षा चौधरी यांनी केली.अवैध सावकारीबाबत संबंधीतांनी त्यांची तक्रार जिल्हा उपनिबंधक तथा संबंधीत तालुका सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात दाखल करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे.
