छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी


सैय्यद मुजीबोद्दीन
यवतमाळ दि.01 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही यापुर्वी कर्जमाफीसाठी अर्ज केला नाही, अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. काही कारणास्तव ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज सादर केले नाही, असे शेतकरी ऑनलाईन पध्दतीने आपले अर्ज 1 मार्च ते 31 मार्च 2018 या कालावधीत भरु शकतात. मात्र या योजनेंतर्गत यापुर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

शेतकऱ्यांनी कर्जमाफी / प्रोत्साहनपर इतर लाभ मिळण्यासाठी करावयाचा अर्ज तथा घोषणापत्र, विहीत नमुन्यातील अर्जात भरावयाची सर्व माहिती भरण्यासाठी नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा. कुटुंब प्रमुख व अर्जात समाविष्ठ करणे आवश्यक असलेल्या कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड तसेच रहिवासी पत्ता दर्शविणारे पुरावे, अर्जात समाविष्ठ असलेल्या सर्व संबंधितांचे थकीत कर्ज खात्याचे तसेच बचत खात्याचे अचुक क्रमांक व बँकेचे नाव आणि शाखा दर्शविणारे माहिती असलेले पुरावे, संपर्क साधण्यासाठी अर्जात नमुद करावयाचा मोबाईल क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची माहिती दर्शविणारा पुरावा (रेशनकार्ड आदी) असणे आवश्यक आहे.तसेच अर्जदार शेतकरीCsmssy.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर स्वत: अर्ज करू शकता. त्यासाठी अर्जदाराने पोर्टलवर जावून प्रोफाईल तयार करावे व लॉगइन आईडी व पासवर्डद्वारे पोर्टलवर माहिती भरावी. या संबंधाने पोर्टलवर दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे विविध टप्प्यांवर करावयाची कार्यवाही पुर्ण करून अर्ज अपलोड कराता येईल. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी स्वत: किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत माहिती भरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सेवा नि:शुल्क आहे.
जिल्ह्यातील कर्जमाफीचे अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी 1 मार्च ते 31 मार्च 2018 या कालावधीत आपले सेवा केंद्रावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post