- जिल्हाधिकारी, महापौरसह जिल्हाप्रशासन व मनपा प्रशासन सहभागी
- बाळापूर उपविभागातील महसुल कर्मचारी सहभागी
- माजी सैनिक संघटनेने केली मोर्णाची स्वच्छता
- बाळापूर व पातूर तालुक्यातील तलाठी , स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील सहभागी
- नगरसेविका उषाताई विरक यांच्या मुलगा जसविर सिंह विरक यांनी बनविले जलकुंभी काढण्याचे यंत्र
- मोर्णातील गाळ शेतक-यांनी घेऊन जाण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
- दर शनिवारी केली जाणार मोर्णाची स्वच्छता
- अत्यंत शांततेत व शिस्तीत पार पाडली मोहिम
नीलेश सुखसोहले
अकोला, दि. 31 – जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनच्या बाराव्या टप्प्यात माजी सैनिकासह विविध संस्थांसह शेकडो लोकांनी सहभाग नोंदविला.
आज गितानगर परिसरात नागरीकांनी मोर्णा नदीच्या काठावर एकत्र येऊन नदीची स्वच्छता केली मागील महिन्याच्या 13 तारखेपासून लोकसहभागातून सुरु झालेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. गितानगर परिसरातील मोर्णा नदीच्या काठावर महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय,मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, बाळापुरचे तहसिलदार दिपक पुंडे, पातूरचे तहसिलदार रामेश्वर पुरी यांच्यासह त्यांचे अधिनस्त कर्मचारी, मुर्तिजापुरचे तहसिलदार राहुल तायडे , बार्शिटाकळीचे तहसिलदार रवि काळे, तहसिलदार राजेश्वर हांडे, नायब तहसिलदार राजेंद्र इंगळे ,नगरसेवक हरिश अलिमचंदानी , संघर्ष समितीचे महादेवराव भुईभार यांच्यासह नियमित येणा-या सामाजिक संस्था व संघटनेच्या प्रतिनीधीसह शेकडो नागरीकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
नगरसेविका उषाताई विरक यांचा मुलगा जसवीर सिंह विरक यांनी एक क्रेन विकत घेउुन त्यावर जाळीचा पिंजरा तयार केला व हायड्रीक पध्दतीने जलकुंभी काढण्याचे काम सुरू केले आहे. या यंत्राचे प्रात्यक्षिक आज मोर्णा नदीत जलकुंभी काढून दाखविण्यात आले. सदर यंत्राचा उपयोग मोर्णा नदीतून संपुर्ण जलकुंभी काढण्यासाठी विनामुल्य करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून मोर्णा स्वच्छता मोहिम यशस्वी होतांना पाहायला मिळत आहे. आणि क्रेनच्या माध्यमातून जलकुंभी काढण्याचा प्रयत्न यशस्वी होतांना दिसत आहे.
आज या मोहिमेत त्र्यंबक सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयचे कार्यकर्ते,माजी सैनिक पुर्ननियुक्त अधिकारी/ कर्मचारी संघटना, उपविभागीय व तहसिल कार्यालय बाळापूर , तहसिल कार्यालय पातूरचे अधिकारी/ कर्मचारी ,माजी सैनिक संघटना, जिल्हा समन्वयक हरिहर जिराफे यांच्या नेतृत्वाखाली नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते , बाळापूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे विकास कोकाटेसह त्यांचे कार्यकर्ते, पातूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना सैनिकी मुलांचे वसतीगृहाचे विदयार्थी तसेच देशभक्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय तांदळी खुर्द ता. पातूर येथील विदयार्थी , ज्योती जार्णोरकर विदयालयाचे विदयार्थी एकत्र येऊन गितानगर जवळील पुलाच्या भागातील परिसरातील मोर्णाच्या काठावर वेस्ट प्लॅस्टीकसह जलकुंभी बाहेर काढून स्वच्छता केली.
शासनाच्या गाळ मुक्त्त धरण , गाळयुक्त शिवार या योजनेतंर्गत शेतक-यांनी मोर्णा नदीच्या काठावरील गाळ आपल्या शेतात घेऊन जावा. याबाबत तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. गाळ काढण्यासाठी लागणारे डिझेलचे पैसे नियमाप्रमाणे शासन देईल. तरी शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. आतापर्यंत मोर्णाच्या 8 किलोमीटर भागातील 7 किलोमीटर पात्राची स्वच्छता करण्यात आली आहे. सदर काम अंतिम टप्पयात असून एप्रिल अखेर पर्यंत लोकसहभागातून काम चालणार आहे. यानंतर मोर्णा स्वच्छतेचे काम मशिनरीव्दारे करण्यात येईल नदीच्या काठावर घाट बांधणे , प्रकाश व्यवस्था करणे बागबगिचे करणे यासारखे कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी चांदखान यांच्या नेतृत्वात सेवा फाऊंडडेशन कार्यकर्ते, लघु व्यवसाई व्यापारी संघटना ,बोरगाव मंजू पोलीस स्टेशन पोलीस पाटील संघटना , नवथळ ग्रामपंचायतीच्या सरपंचसह ग्रामपंचायत सदस्य ,श्री हनुमान जन्मोत्सव शोभा यात्रा समितीचे कार्यकर्ते, बाळापूर उपविभागाच्या महाराष्ट राज्य पोलीस महासंघाचे कार्यकर्ते ,डॉ. तारिक अनवर यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट , गुडमार्निंग किरण चौक ग्रुपचे कार्यकर्त्यासह महसुल व मनपा कर्मचारी व अधिका-यांसह नदीकाठच्या नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद स्वच्छता मोहिमेला लाभला.
नागरीकांसोबतच डॉ. राजेश काटे व डॉ. राजेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वात जुने शहर डॉक्टर असोशिएशनेचे कार्यकर्ते, निमाचे डॉ. मिलींद बडगुजर, डॉ. वर्षा बडगुजर, डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. आनंद चर्तुवेदी, निर्भय बनो जन आंदोलन , पराग गवई मित्रमंडळ, सानिका मल्टीपर्पज फाऊंडडेशनच्या रीना धोटे, सेवनस्टार बहुउददेशीय संस्था, लघु व्यवसायी व्यापारी विकास संघटना,गव्यंम सोशल वेलफेअर सोसायटी, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या पत्नी निता खडसे ,मुलगी साना, मुलगा सनितसह विविध सामाजिक संस्था मोर्णा स्वच्छतेसाठी सहभागी झाल्या होत्या.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नातून अकोल्याचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदीची लोकसहभागातून झपाटयाने स्वच्छता होत आहे. मोर्णा स्वच्छता मिशनच्या आजच्या बाराव्या टप्प्याच्या मोहिमेसाठी त्यांनी नागरीकांना मोर्णा स्वच्छतेसाठी आवाहन केले होते, या आवाहनाला तितकाच भरभरुन प्रतिसाद देत मोर्णा काठी आज हजारो नागरीकांनी एकत्र येऊन मोर्णाची स्वच्छता केली. ही अकोलेकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.
दरम्यान आज सकाळी ठिक 8.00 वाजल्यापासून गितानगर परिसरातील मोर्णाच्या काठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीव्दारे काढण्यात आलेली जलकुंभी तसेच प्लॅस्टिकचा कचरा नागरीकांनी नदीच्या काठावर जमा केला .
मोर्णा नदी पुर्णपणे स्वच्छ करण्याचा संकल्प अनेक जणांनी केल्यामुळे ही मोहिम आता मोठी चळवळ बनलेली आहे. आजच्या मोहिमेत मुंबईवरून अभुदय संघटनेच्या सुमिता केसवा यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी स्वच्छतेसाठी सहभागी झाल्या होत्या.
श्रमदान करणा-या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपाचे कैलास पुंडे सह शहर अभियंता खान, झोन अधिकारी वा.अ. वाघाळकर , आरोग्य निरिक्षक विनित पांडे, आशिष इंगोले, सुरेश पुंड, सुरज खेडकर, शाम बगेरे यांचे सक्रीय योगदान लाभले. व्यापारी, बचतगटाच्या महिला, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी/कर्मचारी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत, वयोवृध्द नागरिक, विदयार्थी आणि सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते. केवळ अकोला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून अनेकजण स्वच्छतेसाठी पुढे येवून आपला सक्रीय सहभाग नोंदविला.
नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते. त्यामुळे सहभागी सर्वांनीच कुठलीही भीती न बाळगता स्वयंस्फुर्तीने नदी काठी प्लॅस्टीक वेस्ट व जलकुंभी जमा केली. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना न घडता ही मोहिम खूपच शिस्तबध्दपणे व शांततेने पार पडली. लोकसहभागातून मोठया प्रमाणात कचरा व जलकुंभी बाहेर काढण्यात आली असून नदी पात्र कच-यातून मुक्त होत आहे. मात्र नदी पुर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची मोहिम सुरू राहणार आहे. लोकसहभागातन एप्रिल महिन्याच्या अखेर पर्यंत चालू राहणार आहे. त्यांनतर मशिनच्या सहाय्याने सदर काम सुरू राहणार आहे. मोहिमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मनपा प्रशासन व जिल्हाप्रशासनातर्फे महापौर विजय अग्रवाल यांनी सहभागी लोकांचे आभार मानले.


