बा
हातात काठी अन्
खांद्याव कुर्हाड.
टिचभर पोटासाठी
बा च पाठीवर बिर्हाड!!
मोकळ्या रानात
बा चा फाटका संसार
नशिबाच्या कुर्हाडीला
रोज लावतोय धार!!
न्हातो उनपावसात
निजे थंडीच्या कुशीत.
हिंडे काट्याकुट्यातून
शीळ घालून खुशीत!!
खातो मिरचीभाकर
करी भूईच अंथरूण.
उद्याच्या स्वप्नांसाठी
घेतो आभाळ पांघरुण!!
जग जाई पुढेपूढे
नाही त्याला खंत.
जगाचा करावया विचार
नसे घडीची उसंत!!
किरण बागल.
लासलगाव.
