- तालुक्यातील काही सेतु केंद्रावर संशयाची सुई
विलास नसले
मुर्तिजापूर( प्रतिनीधी) मुर्तिजापूर तालुक्यात बनावट दस्तावेज तयार करण्याचे प्रकार होत असल्याची ओरड ब-याच कालावधीपासून सुरू होती. परंतु सदर प्रकार दि. 21 रोजी तहसील कार्यालयातील कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. तलाठीचा बनावट शिक्का तयार करून बनावट दस्तावेजावर खोटया स्वाक्षरी करून बनावट उत्पन्नाचा दाखला करण्यात आल्याची बाब दिि. 21 रोजी उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी तलाठी यांच्या तक्रारीवरून एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला दि. 26 पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
बनावट शिक्का तयार करून बनावट दस्तावेजावर तहसीलदारांची स्वाक्षरी करून बनावट दस्तावेज तयार करण्याचा प्रकार मागील काही वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. तालुक्यातील काही सेतु केेद्र संशयाच्या भोव-यात असल्याचेही समजले. याबाबत सविस्तर असे की, शेलुवेताळ येथे राहणारे राजु शहादेव खांडेकर यांचा उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयात आला असता सदर दस्तावेज बनावट असल्याचे व त्यावर असलेला अनभोरा गावाचे तलाठी अजय तायडे यांचा शिक्का आणि स्वाक्षरी देखील बनावट असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी तलाठी तायडे यांनी तालुक्यातील शेरवाडी येथे राहणारे मनोहर ढाकरे वय 71 व राजु खांडेकर वय यांच्या विरूध्द बनावट उत्पन्नाच्या दाखल्याचे दस्तावेज तयार करून तलाठी अहवालावर बनावट शिक्का आणि स्वाक्षरी करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याबाबत मुर्तिजापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. याप्रकरणी मनोहर ढाकरे यांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोली फरार आहे. मुर्तिजापूर पोलीस स्टेशनला अपराध क्र. 92/18 कलम420,467,468,471,34 भा.द.वी. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, पोहेकाॅं. संजय लहाने, पोकाॅ. धम्मदिप गवई, मनिष मालठाणे करीत आहेत.
महत्वाचे कागदपत्र अशाच प्रकारे बनावट
शिक्के तयार करून व बनावट सही करून गुप्तता पाळून दिल्या जात असल्याची चर्चा होत आहे. अशा गंभीर प्रकाराकडे तहसील कार्यालयातील अधिका-यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.सदर इसमाजवळ वेगवेगळ्या अधिकार्यांच्या 40 ते 50 बनावट शिक्के आढळून आल्याचेही समजले. तालुक्यात विविध प्रकारचे बनावट दाखले मोठ्या प्रमाणात देण्यात आल्याची आणि बनावट कागदपत्रे बनवून शेती हडपण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तालुक्यातील काही सेतुकेंद्र रडारवर असून त्यांच्या चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे.
