उमरखेड येथील अवैध सावकाराच्या दुकान व घरावर धाड


सैय्यद मुजीबोद्दीन
दिनांक 28 :  - यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड येथील अवैध सावकार सागर सुभाष आधापुरे व स्वप्नील सुभाष आधापुरे यांच्या मालकीचे तुळजाई ज्वेलर्स व निवासस्थानी सावकारांचे सहाय्यक निबंधक या कार्यालयाने धाड टाकून संशयास्पद असलेले एकूण 20 कागदपत्रे, दस्ताऐवज व इतर साहित्य जप्त केले.उमरखेड येथील सुनंदा प्रकाश वानखेडे यांना सन 2015 मध्ये घरकुती कामाकरीता पैशांची अडचण होती. त्यामुळे त्यांचे ओळखीचे असलेले तुळजाई ज्वेलर्सचे मालक सागर सुभाष आधापुरे व स्वप्नील सुभाष आधापुरे यांच्याकडे त्यांनी मे 2015 रोजी उसने पैशाची मागणी केली. अवैध सावकार यांनी उसने पैसे देण्यास नकार दिला. तुमचे अंगावरील सोन्याचे दागिने गहाण ठेवा, तेव्हा तुम्हाला रक्कम देतो व यास प्रती महा प्रती शेकडा तीन टक्के व्याजदर लागेल, असे सांगितले. नाइलाजस्तव सुनंदा वानखेडे यांनी अंगावरील दागिने गहाण ठेवून 30 हजार रुपये उचल केली. त्यानंतर काही दिवसांनी सुनंदा यांनी अवैध सावकारास 20 हजार व्याज दिले. काही दिवसांनी दागिने परत मागितले. अवैध सावकार यांनी मुद्दल रक्कम 30 हजार व त्यावरील व्याज 39 हजार 600 असे एकूण 69 हजार 600 रुपयांची सुनंदा यांच्याकडे मागणी केली. ऐवढे पैसे दिले तरच दागिने परत मिळतील असे त्यांनी सांगितले.त्यांनतर सुनंदा यांनी वेळोवेळी दागिन्यांची मागणी करूनही दागिने परत न मिळाल्यामुळे सावकाराचे सहाय्यक निबंधक, उमरखेड यांच्या कार्यालयाकडे दिनांक 8 जानेवारी 2018 रोजी रितसर तक्रार दाखल केली. सदर तक्रार अर्जाची चौकशी करून अवैध सावकार यांच्या घर व दुकानावर 26 फेब्रुवारी 2018 रोजी उमरखेड येथील सावकाराचे सहाय्यक निबंधक एस.एस.भालेराव याच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली. यावेळी आर्णी येथील सावकाराचे सहाय्यक निबंधक एस.आर.आंबिलपुरे, ए.डी.भागानगरे, एस.एस.पिंपरखेड, ओ.एम.पहुरकर, एस.एन.कठाळे तसेच शासकीय पंच म्हणून देवराव चव्हाण, भालचंद्र सरोदे, सचिव पोफळी उपस्थित होते. तसेच पोलीस उपनिरिक्षक एस.आर.राजपुत, पोलीस कॉन्सटेबल पी.बी.वानखेडे, महिला होमगार्ड आर.के.हिंगाडे, यांनी सुरक्षा व बंदोबस्ताचे काम पाहिले. उमरखेड तालुक्यात अवैध सावकारी संबंधाने तक्रारी असल्यास सावकारांचे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन एस.एस.भालेराव यांनी केले.

  • यवतमाळातसुध्दा अवैध सावकारावर कार्यवाही

 जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने यवतमाळ तालुक्यातील अवैध सावकार विनोद लक्ष्मण राय रा.ओम कॉलोनी यांच्या घरावर धाड टाकून तपासणी करण्यात आली. या धाडीमध्ये अवैध सावकारीच्या अनुषंगाने आक्षेपार्ह असलेले 22 दस्ताऐवज जप्त करण्यात आले. विनोद लक्ष्मण राय हे अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाली. या तक्रारीच्या आधारावर राय यांच्या ओम कॉलोनी येथील निवासस्थानी धाड टाकण्यात आली. धाडीमध्ये राय यांच्या घरुन अवैध सावकारीबाबत प्लॉट, शेतजमीन खरेदी, कोरे चेक, गाडीची कागदपत्रे, कोरे स्टॅम्प असे एकूण 22 आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली. ही सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली असून कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. राय यांनी व्याजाने दिलेले पैसे धमकावून वसूल करीत असल्याबाबत प्रविण गुल्हाणे यांनी अवधुतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निबंधक सुचिता गुघाने, सहाय्यक निबंधक व्हि.व्हि.रणमले, राजेश गुर्जर, मनोज भगत, विलास हिरुळकर, सोनोने थोरात यांनी सदर कार्यवाही केली. अवैध सावकारीबाबत संबंधीतांची तक्रार असल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय किंवा संबंधीत तालुका सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post