कापूस गठाणीच्या ट्रकसह चोरट्यांना अटक


यवतमाळ :- कापसाच्या गठाणी भरून असलेला ट्रक येथील रिलायन्स पेट्रोलपंप समोरून चोरी गेला होता. एसपींच्या विशेष पथकाने कसून चौकशी करून दोन दिवसातच ट्रक चोरट्यांचा पर्दाफाश करून दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून कापूस गठाणी, ट्रक असा ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चालक अक्रम अली उर्फ बाबा अय्यूब अली रा. बिलाल कॉलनी पांढरकवडा रोड यवतमाळ, क्लीनर शेख अमिरोद्दीन उर्फ सोनू शेख अलीमोद्दीन रा. इंदिरानगर यवतमाळ अशी आरोपींची नावे आहे. २१ फेबु्रवारी रोजी आशिष खान मदार खान रा. यवतमाळ यांच्या मालकीच्या एम. एच. ३४ / एबी ७७२५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये सेलू येथील एस. आर. कॉटन जिनिंगमधून कापसाच्या २० टन गठाणी भरण्यात आल्या. या गठाणी घेऊन ट्रक एम.आय.डी.सी यवतमाळ येथे पोहोचविण्या करिता निघाला. अशातच चालकाने ट्रक रिलायन्स पेट्रोलपंप येथे रात्री ११ वाजता ट्रक पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता हा ट्रक जागेवर नसल्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे आशिष खान यांनी शहर पोलीस ठाणे गाठून कापसाच्या गठाणी व ट्रक चोरून नेल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. अशातच सदर ट्रकचालक व क्लीनरने चोरून नेल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरवून दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता, गुन्ह्याची कबुली दिली. ट्रक अकोला बाजार ते तळणी रोडवर बाजूला ठेवल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी कापसाच्या गठाणी व ट्रक असा एकूण ३३ लाख ९५ हजार ८५९ क्रमांकाचा मुद्देमाल जप्त करून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी, शहरचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सैय्यद साजीद, अजय डोळे, पोहकॉ रवी आडे, पोलीस नाईक वासू साठवणे, रूपेश पाली, प्रदीप नाईकवाडे, पोलीस नाईक योगेश डगवार, चालक अजय ढोले यांनी केली. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक मिलन कोयल करीत आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post