![]() |
नीलेश सूखसोहळे
- लोकप्रतिनिधी, विदयार्थी, वयोवृध्द नागरिकांनी केली मोर्णाची स्वच्छता
- विविध सामजिक संस्था, शासकीय कर्मचारी यांचा सहभाग
- अत्यंत शांततेत व शिस्तीत पार पाडली मोहिम
- दर शनिवारी केली जाणार मोर्णाची स्वच्छता
- नदीकाठी होणार बगीचा, घाट निर्मिती
अकोला, दि. 3 :- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नातून अकोल्याचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदीची लोकसहभागातून झपाटयाने स्वच्छता होत आहे. मोर्णा स्वच्छता मिशनच्या आजच्या पाचव्या टप्प्याच्या मोहिमेलाही जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला. लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, शासकीय कार्यालयाचे कर्मचारी, विदयार्थी, महिला, सर्वसामान्य नागरिकांनी आज उत्स्फुर्तपणे मोर्णाची स्वच्छता केली. दि. 13 जानेवारीपासून सुरु झालेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी लोकांनी दिलेला प्रतिसाद चकीत करणार आहे, अशी उत्स्फुर्त दाद देत जिल्हाधिकारी म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या योगदानामुळे मोर्णा आता स्वच्छ होण्याच्या वाटेवर आहे. आनंदाची बाब म्हणजे मोर्णाच्या विकासासाठी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार रणधीर सावरकर यांनी प्रत्येकी पंधरा लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. तसेच माजी राज्यमंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी रुपये एक लाख दिले आहेत. या निधीतून मोर्णाचा किनारा सुंदर केला जाणार आहे, यामध्ये प्रामुख्याने घाटाची निर्मिती, बगीचा, लाईटची व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत. भविष्यात गोमती व साबरमती नदीच्या धर्तीवर मोर्णाचा कायापालट केला जाणार आहे.
दरम्यान आज सकाळी ठिक 8.00 वाजता मोर्णाच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. पुलाला लागून असणाऱ्या नदीकाठच्या निमवाडी आणि लक्झरी बसस्टँडच्या मागील बाजूला असणाऱ्या नदीकाठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीव्दारे काढण्यात आलेला कचरा लोकांनी वाहनांमध्ये भरुन दिला. तसेच नदीपात्रात उतरुन शेकडो लोकांनी सांघिकरित्या कचरा बाहेर काढला.
![]() |
![]() |
नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते. त्यामुळे सहभागी सर्वांनीच कुठलीही भीती न बाळगता स्वयंस्फुर्तीने नदी काठावरील कचरा हिरीरीने ट्रॅक्टर व घंटागाडीत टाकला. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना न घडता ही मोहिम खूपच शिस्तबध्दपणे व शांततेने पार पडली. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचा नदीकाठी वाढदिवस साजरा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा मोर्णा स्वच्छता मोहिमेत झपाटून काम करणारे प्रा. संजय खडसे यांचा वाढदिवस आज मोर्णा नदी किनारी अत्यंत आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. नदी काठी छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आणि श्रमदात्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, मोहिमेकरीता आवश्यक असणारी साधने व साहित्य मनपाकडून पुरविण्यात आले. यावेळी सर्पमित्र पथक, वैदयकीय सहायता पथक, पाणी व्यवस्थापन, साहित्य पुरवठा, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक नदीकाठी हजर होते. मोहिमेत पिंजर येथील संत गाडगेबाबा नैसर्गिक आपत्ती बचाव पथक, मूर्तिजापूर येथील येथील गाडगे बाबा स्वच्छता मंडळ स्वच्छता अभियान पथक, एलआरटी महविदयालय, शिवाजी महाविदयालय आणि सीताबाई आर्टस महाविदयालयाचे एनएसएसचे विदयार्थी, हिरकणी वस्तीस्तर संघ, शौर्य संस्था, प्रबुध्द भारत बहुउदेशिय संस्था,लघु व्यवसाय व्यापारी विकास संस्था, संस्कार इंग्लिश स्कूलचे विदयार्थी, विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना, वेदाश्रम फिल्म असोसिएशन, पोलीस पाटील संघटना, विदर्भ पटवारी संघटना, सेवा फाउंडेशन, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, समृध्दी वस्तीस्तर संघटना, जिजाऊ ब्रिगेड, आयुर्वेदीक महाविदयालय, पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी, स्वस्त धान्य दुकानदार संघटना व केरोसीन डिलर संघटना, संकल्प प्रतिष्ठानचे सदस्य, श्रीकृपा पेट्रोल पंपाचे कर्मचारी आणि मनपाचे सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.



[okju
Reply