![]() |
सलमान खान
अमरावती, दि. 23 : माहिती व तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात दैनंदिन व्यवहारात डिजिटल तंत्रज्ञानाचा सर्वत्र वापर होत असून, त्याद्वारे फसवणूक टाळण्यासाठी सजगता बाळगली पाहिजे. सायबर दक्षतेविषयी अधिकाधिक जनजागृती होण्यासाठी पत्रकार बांधवांनीही योगदान द्यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी आज येथे केले.ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी माध्यम प्रतिनिधीसाठी पोलीस आयुक्त कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तालयातील सभागृहात कार्यशाळा आज झाली. त्यावेळी श्री. मंडलिक बोलत होते. पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे आदी उपस्थित होते.श्री. मंडलिक म्हणाले की, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्वसामान्य व्यक्तींना विविध प्रलोभने दाखवून फसवणूकीचे, तसेच सामाजिक, आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या काळात अद्ययावत तंत्रज्ञानाबाबतची माहिती व घ्यावयाची दक्षता नागरिकांना माहिती असणे आवश्यक असते. त्यामुळे ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्रअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पत्रकार बांधवांनीही सायबर दक्षतेच्या प्रसारासाठी योगदान द्यावे, असेही श्री. मंडलिक म्हणाले.श्री. पांडे यांनी यावेळी सादरीकरणातून सायबर गुन्ह्यांची ओळख, प्रकार, सोशल मिडीया, बँकिंग व विम्यासंदर्भातील गुन्हे, सायबर गुन्ह्यांचे स्वरुप, आवश्यक उपाययोजना, नागरिकांची कर्तव्ये या विषयावर माहिती दिली. ते म्हणाले की, इंटरनेटने जोडलेल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे होणा-या व्यवहारांना गुन्ह्यांची जोखीम असते. अशावेळी वापर करणा-यानेच काही बाबींचे पालन केले तर फसवणूक टाळता येते. माहितीची गोपनीयता व आपले स्वातंत्र्य जपण्यासाठी अक्षर, चिन्ह,अंक यांचा वापर करुन कठीण पासवर्ड बनवणे, पासवर्ड बदलण्याची काळजी घेणे, माहितीची गोपनीयता जपणे अशा सवयी अंगी बाणवून घेतल्या पाहिजेत. ऑनलाईन जॉब कन्सल्टन्सी वेबसाईटवरुनही प्रलोभने दाखवून फसवणूक होते. अशा प्रलोभनांना बळी पडता कामा नये. या कार्यक्रमाला इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.