मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण द्या


जामखेड :- 'नोकऱ्या संपल्या असल्याने तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. मराठा आरक्षणाची लढाई ही शांततेच्या मार्गाने लढणार आहोत. शासनाने सर्व मराठा समाजास कुणबी मराठा समजून सरसकट ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे,' असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.

जामखेड शहरात बुधवारी (१० ऑक्टोबर) खेडेकर यांच्या उपस्थितीत मराठा जनसंवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी खेडेकर बोलत होते. या वेळी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, मराठा सेवा संघाचे जामखेड तालुका अध्यक्ष राम निकम, डॉ. राजेंद्र पवार, अशोक शेळके, महाडीक, शहाजी वायकर, डॉ. सुहास सूर्यवंशी, आशिष पाटील, वाळेकर, खेंगरे, प्रा. शहाजी डोके, नारायण लहाने, हनुमंत निंबाळकर, बजरंग पवार, अवधूत पवार, संभाजी ढोले, भानुदास बोराटे, नामदेव राळेभात, दिगंबर पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खेडेकर म्हणाले, 'इंग्रज सरकारने केलेल्या नोंदीत मराठ्यांचा मराठवाडा वगळता सर्वत्र कुणबी असाच उल्लेख आहे. कुणबी ही जात ओबीसीमध्ये आहे. याचा फायदा अनेक मराठा नेत्यांनी राजकीय पदांसाठी केला आहे. सध्याच्या काळात शासकीय नोकऱ्या संपल्या आहेत. मराठा तरुणांनी आवडेल ते काम करून मराठा समाजानेच समाजाचा विकास करणे हाच एकमेव उपाय असून प्रत्येकाने आपल्या घरात शिवाजी तयार करून त्याच्या पाठीमागे आई-वडिलांनी खंबीर उभे राहिले पाहिजे. तसेच विज्ञान युगामध्ये जगत असताना विज्ञानवादी झाले पाहिजे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात महत्वाचे स्थान दिले पाहिजे. आई व पत्नीचा सल्ला घेतला पाहिजे, समाज्यातील एकमेकमधील तंटे सामोपचाराने मिटवले पाहिजेत. जिजाऊ श्रृष्टी आपले श्रद्धास्थान म्हणून निर्माण केले पाहिजे. १४ जानेवारीला या श्रद्धास्थानाला भेट दिली पाहिजे. इतर समाजाचे उनेधुणे न काढता त्यांच्यतील आदर्श घेतला पाहिजे, असे खेडेकर म्हणाले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post