मुर्तिजापूर :- यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या पूर्वी तालुक्यात झालेल्या पावसामुळे सर्वत्र समाधानकारक वातावरण दिसून येत होते. आणि पिकांची स्थिती देखील उत्तम होती. परंतु पावसाने ऑगस्ट महिन्यात पूर्ण विश्रांती घेतल्यामुळे आणि ऊन तापू लागल्याने वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम पिकांवर झाला. यामध्ये सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त होत आहे. अनेक गावातील पिके वाळत चालले असून सोयाबीनचे उत्पन्न एकरी 10 वरून 6 क्विंटल वर येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अत्यंत चांगल्या पद्धतीने आलेले पीक हातातून जात असल्याचे पाहून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एक वेळा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचे कारण ठरणार आहे. तालुक्यातील खडस
पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनेक गावांमध्ये सोयाबीन पीक करपत चाललेले आहे. सोयाबीन पीक चांगले आले असताना आता शेंगा भरणी साठी पाण्याची आवश्यकता असताना पाण्याने दडी मारल्यामुळे सोयाबीन पिक प्रति एकरी उत्पादन पंचवीस ते तीस टक्क्यांनी घसरणार असल्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केल्या जात आहे. त्यामध्ये अनेकांनी स्प्रिंकलर आणि मिळेल त्या साधनातून पाणी देऊन उत्पन्न घटू नये याकरिता प्रयत्न चालविले आहेत. परंतु काही भागात विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने त्यावर विरजण पडत आहे .
या बाबी देखील शेतकऱ्यांचे प्रति एकरी उत्पन्नात घट येण्यासाठी कारणीभूत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले . तालुक्यातील कानडी बाजार परिसरात मुख्य पिक असलेले सोयाबीन पाऊस लांबल्याने पूर्णावस्थेपूर्वी करपत असून यामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर दिसत आहे. शासनाने या पिकांचे सर्वे करण्याची मागणी देखील परिसरातील बळीराजा करीत आहे. तालुक्यातील मधापूरी, विरहित, कानडी बाजार ,धोत्रा , धानोरा ,निंबा, कमळणी तसेच इतरही गावातील पिके करपत आहेत.
पिकांवर पाण्याअभावी करता येत असून पूर्णावस्थेपूर्वी सोयाबीन वाळत चाललेले आहे. या पिकांचा सर्वे कृषी विभागामार्फत करून शासनाने पीक विमा आणि आर्थिक मदत द्यावी
बाळू राठोड शेतकरी कानडी बाजार
निसर्गाच्या लहरीपणा शेतकऱी आणि पिकांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. सप्टेंबर महीन्यात सोयाबीनच्या शेंगा भरणासाठी पोषक ठरु शकणारा पाऊस लांबल्याने आणि वातावरणातील बदल यामुळे काही भागात उत्पन्नात घट होणार. शिवाजी शेंडे शेतकरी चिखली कादवी.
