इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- आकाशवाणी प्रसारमाध्यमातून शासकीय ध्येय धोरण आणि योजनांचे प्रभावीरीत्या सादरीकरण केल्याबद्दल उस्मानाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांचा आकाशवाणीकडून नुकताच यथोचित सन्मान करण्यात आला.त्यांना आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल यांच्या स्वाक्षरीचे " प्रशंसनीय व्यावसायिक सहकार्य " असे प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.
उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रावरुन 2017-2018 वर्षात जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी पालकमंत्री,इतर लोकप्रतिनिधी,विविध शासकीय अधिकारी तसेच शासकीय योजनांच्या शंभर पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलाखती प्रसारित केल्या. स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांकरिता काही विशेष कार्यक्रम घेतले.त्यातून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
आकाशवाणी हे प्रसारमाध्यम ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त माध्यम मानले जाते.या माध्यमाचा ग्रामीण भागाच्या विकासासाठी किंवा शासन करीत असलेल्या कामांची योग्य प्रकारे सर्वदूर लोकांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचण्याचे अत्यंत प्रभावी असे माध्यम आहे.आजही खेड्यापाड्यामध्ये आकाशवाणी हे लोकप्रिय माध्यम आहे.जुन्या जाणत्या लोकांपासून ते आजच्या तरुण पिढीपर्यंत बरेच कार्यक्रम आकाशवाणीद्वारे ऐकले जातात.
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशवाणी सारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले होते.उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे केंद्रप्रमुख शिनगारे, कार्यक्रम विभागप्रमुख बरीदे, कार्यक्रम अधिकारी कृष्णा शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून जिल्हा माहिती कार्यालयाला मोलाचे सहकार्य लाभले.
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचे मार्गदर्शन आणि उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राच्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले..माझ्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्यासह संचालक अजय आंबेकर, शिवाजी मानकर, औरंगाबाद विभागाचे प्र. संचालक व लातूर विभागीय उपसंचालक यशवंत भंडारे यांच्या मार्गदर्शनातून वेगवेगळ्या कल्पना राबविण्यात आल्या. या सर्वांमुळेच हे काम करु शकलो.
राज्यस्तरीय बैठकीत चर्चा होऊन आकाशवाणी केंद्राचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल यांनी दखल घेत विशेष प्रमाणपत्र व अभिनंदनाचे पत्र दिले. यातून एक प्रेरणा मिळाली.' , अशी प्रतिक्रिया उस्मानाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी बोलताना दिली.
