शिवशाहीचे अपघात रोखण्यासाठी उपायोजना


औरंगाबाद :- शिवशाही बसच्या अपघातांना फक्त बस जबाबदार नाही, तर खराब रस्ते, इतर वाहने सुद्धा जबाबदार आहेत. अपघात रोखण्यासाठी कंपनी आणि एसटी महामंडळाचे अधिकारी योग्य ती उपाययोजना करण्याचा निर्णय लवकरच घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी परिवहन मंत्री रावते हे सोमवारी (१७ सप्टेंबर) शहरात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली. 'सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिने एसटी मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाकरिता ७५० रुपये प्रतिमाह देण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे महामंडळावर ५३ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे,' अशी माहिती त्यांनी उपस्थित कामगारांना दिली. यावेळी कामगार संघटनांचे पुढारी उपस्थित नव्हते. कामगारांना त्यांच्या अपेक्षेनुसार वेतनवाढ मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

सिडको बसस्थानकाचे रुपांतर स्मार्ट सिटीच्या निधीतून अद्ययावत बस पोर्टमध्ये करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. याववेळी विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी, यंत्रचालन किशोर सोमवंशी, आगार व्यवस्थापक अमोल भुसारी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. ओव्हर टाइम देण्याच्या पद्धतीत थोडा बदल केल्यामुळे साठ लाख रुपयांची बचत झाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी मंत्र्यांना दिली. राज्यातील कोणत्याही आगारात याप्रकारे बचत झाली नसल्याचे सांगून रावते यांनी या कार्याची प्रशंसा केली.

महिला कर्मचाऱ्यांनी मांडल्या समस्या .
मध्यवर्ती बसस्थानकातील महिला कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या. लहान मुले, पतीचीही नोकरी यामुळे कुटुंबाकडे लक्ष पुरवता येत नाही यासह इतर समस्या मांडल्या. त्या समस्या मंत्र्यांनी शांतपणे ऐकूण घेतल्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post