मतदार नोंदणी प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख



  •  1 सप्टेंबरपासून मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम
  • चावडीच्या माध्यमातून गावागावात मतदार याद्यांचे वाचन

यवतमाळ, दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात 1 सप्टेंबर 2018 पासून ही प्रक्रिया सुरू होत आहे. नवमतदार, स्त्री मतदार, अपंग, आदिवासी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, कामगार यांच्यासह समाजातील तळागाळातील मतदारांची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून या मतदार नोंदणी प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय विभाग तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी निवडणूक संदीप महाजन, सहकारी संस्थेचे उपनिबंधक गौतम वर्धन, नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा आदी उपस्थित होते.

शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयातून मतदार यादी त्रृटीरहीत व परिपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, 1 सप्टेंबर रोजी प्रसिध्द होणारी मतदार यादी सर्वांनी बघावी. आदिवासी आणि दुर्गम भागातील मतदार नोंदणीकरीता विशेष लक्ष द्यावे. कामाच्या निमित्ताने येणारे स्थलांतरीत मतदार, शाळा-महाविद्यालयातील नवमतदार, अपंग, स्त्री मतदार आदींची 100 टक्के नोंदणी करणे आवश्यक आहे. 1 जानेवारी 2001 रोजी तसेच त्यापुर्वी जन्मलेले जिल्ह्यातील सर्व मतदारांचा नोंदणीमध्ये समावेश करावा. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार याद्यांच्या वाचनासाठी गावागावात चावडी वाचनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मतदार यादीत आपल्या नावाची खात्री करून घ्यावी. यादीत नाव नसेल तर त्वरीत मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात राबविण्यात येणा-या मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत शनिवार दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत आहे. 30 नोव्हेंबर 2018 पुर्वी दावे व हरकती निकालात काढणे, 3 जानेवारी 2019 पूर्वी डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई तर 4 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 1 जानेवारी 2019 रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 1 जानेवारी 2001 वा त्यापुर्वीची आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील.

1 सप्टेंबर 2018 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ठ केली गेलेली नाही अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदणीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती/ सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. हे अर्ज 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येतील. पुर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेले, अन्यत्र स्थलांतरीत झालेले किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.

राजकीय पक्षांनीसुध्दा प्रत्येक मतदार केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांची नेमणूक करावी. तसेच शासनाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशीलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. उपरोक्त सर्व माहिती 1 सप्टेंबर 2018 पासून संकेतस्थळावर उपलब्ध राहील, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यातील 2310 मतदान केंद्रात नव्याने 181 केंद्रांची वाढ होऊन सद्यस्थितीत एकूण 2491 मतदान केंद्र अस्तित्वात आहेत. प्रत्येक केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नेमण्यात आले आहे. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांच्या माध्यमातून पार पाडण्यात येईल. जिल्ह्यात दिव्यांग मतदार नोंदणीवर विशेष लक्ष राहणार असून आतापर्यंत 6361 दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी संदीप महाजन यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post