मराठा आंदोलना निमित्त अकोला शहरासह, संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद.



अकोला :-  मराठा आरक्षणासाठी गुरुवार ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात बंद व ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. अकोल्यात बंदला शतप्रतिशत प्रतिसाद मिळाला. शाळा महाविद्यालयांसह शहर व जिल्ह्यातील बाजारपेठा कडकडीत बंद होत्या. अकोला शहरात निघालेल्या सकल मराठा समाजाच्या अभूतपूर्व रॅलीने शहर दणाणून गेले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून मोर्चे, धरणे आंदोलने सुरू आहेत. पण सरकारकडून फक्त आश्वासनांशीवाय काहीही मिळाले नाही. परिणामी शांततापूर्ण मोर्चाचे रूपांतर आक्रमक मोर्चानमध्ये होऊन गेल्या पंधरवाड्यापासून राज्यात मराठा आंदोलनांनी पुन्हा जोर धरला. गेल्या पंधरा दिवसात राज्यात ठिकठिकाणी जिल्हा स्तरावर आंदोलने सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी ९ ऑगस्टला राज्यस्तरीय बंद चे आवाहन करण्यात आले होते.


त्यानुसार आज राज्यात कुठे धरणे, कुठे निदर्शने, कुठे ठिय्या तर कुठे बंद अशी विविध आंदोलने पार पडली. अकोल्यात सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघालेल्या या रॅलीने शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत जोरदार घोषणांनी अकोल्याचा आसमंत दणाणून सोडला. अशी अभूतपूर्व आणि शिस्तप्रिय रॅली शहरात याआधी कधीही पाहायला मिळाली नाही. हजारो मराठा युवक भगवे झेंडे घेऊन रॅलीत सहभागी झाले होते.

शिवरायांच्या नावाने गगनभेदी जयजयकार करीत निघालेल्या या रॅलीने मराठा सामाजाची ताकद दिसून आली.
शहर व जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश कालच जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले होते. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद होती. बाजारपेठेतही सकाळपासूनच आज कोणी आपली दुकाने उघडली नाही. सर्व मार्गावरील व सर्व भागातील बाजारपेठा बंद होत्या.


 बस स्थानकावर शुकशुकाट पसरला होता. दरम्यान बंद च्या पृष्ठभूमीवर शहर व जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. अकोला शहरासह जिल्ह्यात सर्व तालुक्यात ठिकठिकाणी बंद चे प्रतिसाद दिसून आले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post