औरंगाबाद :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक तरुणाने गोदावरीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळीच संतप्त आंदोलकांनी औरंगाबाद-पुणे मार्ग बंद केला असून ठिकठिकाणी बसेस अडविण्यास सुरुवात केली आहे. या संपाचा सर्वाधिक परिणाम मराठवाड्यात दिसून येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मराठवाड्यातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय अफवा पसरू नयेत म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या आठवडाभरात ठिकठिकाणी मोर्चे, ठिय्या आणि धरणे आंदोलने करत आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवला होता. सोलापूरमध्ये तर आंदोलकांनी १६ बसेस फोडल्या होत्या. आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला पूजेसाठी जाण्याचंही रद्द केलं होतं. त्यातच काकासाहेब शिंदे या आंदोलक तरुणाने आरक्षण मिळत नसल्याने सरकारचा निषेध म्हणून औरंगाबादमधील गोदावरी नदीत जलसमाधी घेतल्याने वातावरण तापले असून क्रांती मोर्चाने आज बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच राज्यभर या बंदचा परिणाम जाणवू लागला आहे. औरंगाबादमध्ये बंदमुळे सरकारी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. उस्मानाबादमध्येही आंदोलकांनी धरणे आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे उस्मानाबादेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काल रात्री पंढरपूरहून निघालेली वारकऱ्यांची बस बंदमुळे लातूर बसस्टँडवरच फसली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना बसमध्ये तिष्ठत बसावे लागत आहे. धक्कादायक म्हणजे बस सुरू होत नसल्याने रात्रभर बसमध्ये थांबावं लागलेल्या वारकऱ्यांनी कंडक्टरला तिकीटाचे पैसे परत मागायला सुरुवात केली असून कंडक्टरने त्यांना पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या वारकऱ्यांना नाईलाजाने बसमध्येच थांबावे लागत आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा होणारा सत्काराचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तर अहमदनगरमध्येच श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे नगर-दौंड रस्त्यावर आंदोलकांनी रास्तारोको सुरू केल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. पाथर्डीतही सर्व व्यापारी पेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून खर्डा येथे रास्तारोको करण्यात आला आहे.
पुण्यात जनजीवन सुरळीत
पुण्यात महाराष्ट्र बंदचा फारसा परिणाम झालेला नाही. पुण्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असून नेहमीसारखीच वर्दळ सुरू आहे. एसटी आणि रिक्षाही व्यवस्थित धावत असून शाळा-महाविद्यालयेही सुरू आहेत. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नाशिकमध्येही नाशिक-औरंगाबाद एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.
