पावसाची संततधार सुरूच-- नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा



  • शेतातील पिकांचे झाले नुकसान  
  • तालुक्यातील शेकडो घरात पाणी शिरल्याने अनेक घरांची पडझड


विलास नसले
मुर्तिजापूर  (प्रतिनिधी) :- तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून दिनांक 11 /7/2018 रोजी तालुक्यातील नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पुराचे पाणी गावांंमधे शिरले .यामध्ये मौजे राजुरा सरोदे येथील एका घरात पाणी शिरून घराची भिंत पडली. तर राजनापूर खिनखीणी या गावात सात घरांमध्ये पाणी घुसले.


तर 17 घरे व गोठा यांच्या भिंती पडल्या .सैदापूर मध्ये तीन घरांच्या भिंती पडल्या. मात्र सुदैवाने कुठेही प्राणहानी झाली नाही .उमा नदीकाठावर असलेल्या माना गावात पुराच्या पाण्याने थैमान घातले. या गावात जवळपास 180 घरात पुराचे पाणी गेले. तर 22 घरांच्या भिंती पडल्या आहेत. मात्र कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. 

त्याच प्रमाणे तालुक्यातील लंघापूर या गावात चार घरांमध्ये पाणी शिरले .पाच घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर पोही गावात जाण्या-येण्याचा मार्ग बंद असल्याने संपर्क तुटलेला आहे . अकोली जहागीर येथे आठ घरांमध्ये पाणी शिरले तर तीन घरांच्या भिंती पडल्याची घटना घडली. मौजे धामोरी बुद्रुक येथे दोन घरांच्या भिंती पडल्या. तालुक्यातील ग्राम कुरुम येथील कोणीही बेघर झालेले नाही. 


या गावात देखील नाल्याच्या पुराने थैमान घातले आणि 99 लोकांच्या घरात पुराचे पाणी गेले. त्यापैकी आठ लोकांच्या घरातील धान्याचे व इतर वस्तूंचे नुकसान झाले. मंदुरा या गावात घरात पाणी शिरले. तर उनखेड येथे एका घराची भिंत पडल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याच प्रमाणे नाल्यांचे पाणी शेतांमध्ये घुसून शेकडो एकर जमिनीवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज देखील पावसाची सततधार सुरू असल्याने नदी व नाल्या काठावरील गावांंना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.                                                         
सर्व नुकसानीचा सर्वे करण्यात येत आहे. संपूर्ण तालुक्यातील सर्वे पूर्ण झाल्यानंतर एकूण नुकसानीचा अंदाज येईल.              
प्रभारी तहसीलदार वैभव फडतरे 
                                   
नदी व नाल्याच्या काठी असलेल्या  गावातील नागरिकांनी सतर्क राहावे.  खोराडी नाले नद्या यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पुल पार करण्याचा प्रयत्न करू नये .                       
 उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाणे 


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post