- नागरिकांना मनस्ताप करण्याची वेळ
मुर्तिजापूर(प्रतीनिधी) :- येथील पोस्ट खात्याच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मूर्तिजापूर येथील पोस्ट खात्याच्या कार्यालयात विविध कामानिमित्त दररोज शेकडो लोकांची आवाजाही सुरू असते. यामध्ये विविध बचत योजनांच्या अंतर्गत जमा असलेली आपली रक्कम खात्यातून काढणे, त्याप्रमाणे विविध प्रमाणपत्र किंवा कागदपत्र पाठविणे अशी वेगवेगळी कामे पोस्ट खात्याच्या कार्यालयात दररोज सुरू असतात. एक वर्षापासून या खात्याचा कारभार नागरिकांना मनस्ताप देणारा ठरत असल्याचे अनेकांनी सांगितले.
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या कार्यालयात पूर्वी ९ कर्मचारी विविध टेबलवर बसून काम सांभाळत होते.पोस्टमास्टर आणि एक उपपोस्टमास्टर अशी पदे होती. परंतु संगणक आल्यापासून या पदांच्या संख्येत घट होऊन सात कर्मचारी आणि एक पोस्ट मास्तर अशी संख्या कर्मचाऱ्यांची झाली. परंतु कधीही पुर्ण कर्मचारी या कार्यालयात दिसून आले नसल्याचे समजले.
या ठिकाणी 6 कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून एक पोस्ट मास्तर असे मिळून सात जण कार्यरत आहेत. त्यापैकी एक कर्मचारी दहा महिन्यांपासून पिंजर तालुका बार्शीटाकळी येथे डेपोटेशन वर गेले आहेत. तर एन.आर.गावंडे हे तीन महिन्यापासून माना येथे कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे कार्यालयीन कर्मचारी प्रांजली जोशी प्रसुती रजेवर असून उर्वरित तीन पैकी दोन जण आज अचानक आजारी पडल्याने आणि एक कर्मचारी नवीन असल्याने कामकाज होऊ शकले नाही.
उपस्थित नागरिकांनी व ग्राहकांनी पोस्ट खात्यामध्ये तीन दिवस रक्कम काढण्याकरता लागतात आणि पोस्ट मास्तर यांचे बोलणे देखील व्यवस्थित नसल्याचे सांगितले. सदर कार्यालयात कार्यरत ५ पैकी २ डाकसेवक (पोस्टमन) व १ ग्रामीण डाकसेवक येथे कार्यरत आहेत त्यामुळे लोकांना वेळेवर डाक पोहोचत नसून लग्नपत्रिका वेळेवर मिळत नसल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.
कार्यालयात कामानिमित्त आलेले माणीकराव माणिकपुरे, राहुल पाटील, एस. एस. सोळंके, रवींद्र जोत, गोपाल भारूका, नामदेव वाघमारे, सुरेश बैस,रवी चव्हाण तसेच काही महिला देखील कामकाजानिमित्त कार्यालयात आल्या होत्या. परंतु त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षभरापासून नागरिक मनस्ताप सहन करत असून कधी कर्मचारी नसतात तर कधी कर्मचारी असून देखील कामे होत नाहीत असाही अनुभव त्यांनी सांगितला.
कार्यालयाची कामकाजाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. परंतु कर्मचारी हे साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान येत असल्याने सकाळी नऊ वाजेपासून कामकाजासाठी येणाऱ्यांना त्यांची वाट पाहात ताटकळत उभे राहावे लागते. सदर बाब अतिशय गंभीर आहे या सर्व प्रकाराबाबत पोस्ट खात्याचे सहाय्यक अधीक्षक। शे.कदिरसाहेब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही . अद्यापही लोकांची नाळ पोस्ट खात्याची जुळलेली आहे .आणि लोकांचा ऋणानुबंध अद्यापही कायम आहे याची जाणीव पोस्ट खात्याने ठेवली पाहिजे. यासाठी वरिष्ठांनी आणी। लोकप्रतिनिधींनी दखल घेणे गरजेचे आहे.
वरीष्ठांना वेळोवेळी मेल पाठवले आहेत. सर्व प्रकारची माहिती दिली आहे. जनतेला होणाऱ्या त्रासाची जाणीव आहे. अचानक दोन कर्मचारी आजारी पडले. कामकाजावर परिणाम झाला. एन.ए.खान पोष्टमाष्टर मुर्तिजापूर
