कुरूम : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाकरिता बस स्थानकालगत गावातून वाहणाऱ्या नाल्यावर पुलाकरिता तयार करून ठेवलेला मोठा खड्डा पावसाच्या पाण्याने संपूर्ण भरल्याने खचत असल्यामुळे गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला तसेच पथदिव्याच्या विद्दुत खांबाला धोका निर्माण झाला असून एखादी मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुरूम गावालगत राष्ट्रीय महामार्ग असल्याने त्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम कुरूमसह संपूर्ण अकोल्या जिल्ह्यात सध्या सुरु आहे.चौपदरीकरणाच्या कामा करीता कुरूम बस स्थानकालगत असलेल्या व गावातून वाहणाऱ्या नाल्यावर पूलाच्या बांधकामाकरिता क्रित्येक दिवसापासून अंदाजे ८ ते १० फूट खोल,२५ फूट लांब व २० फूट रुंद असा खड्डा खोदून ठेवला आहे.पावसाळ्यात पावसाचे पाणी,तसेच नाल्याला आलेल्या पुराचे पाणी त्यात शिरल्याने तो संपूर्ण खड्डा जलमय झाला आहे.कुरूम व परिसरात पाच दिवस झालेल्या धुवाधार पावसामुळे मोठया प्रमाणात आलेल्या पुरामुळे पाण्याच्या प्रवाहाने तो खड्डा खचल्याने त्याची मोठी झळ एका हाँटेलसह कुरूम बस स्थानकावरून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला तसेच मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पथदिव्याचा विद्दुत खांबाला बसल्याने धोका निर्माण झाला आहे.या झळी मूळे मुख्य रस्ता खचण्याच्या मार्गांवर असून तसेच पथदिव्याचा खांब कोसळल्यास एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी संबंधित विभागाने या गंभीर समस्येची दखल घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
