नगर येथील श्रीगोंद्यात वाळू तस्करांनी तहसीलदारांच्या वाहनचालकाला रात्री मारहाण केली, तसेच वाळू पथकात दिसल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. बाळासाहेब डोइफोडे हे दुचाकीवरुन घरी जात असताना अज्ञातांनी त्यांची गाडी रोखली. ते तिघे जण वाळू तस्कर असल्याचा संशय आहे.
त्यांनी डोईफोडे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आमची वाळूची गाडी पकडून दिल्यानं आम्हाला दोन ते तीन लाखाचा दंड झाल्याचं ते सतत डोईफोडे यांना ऐकवत होते. तसेच परत वाळू पथकात दिसल्यावर जीवे मारू अशी धमकी त्यांनी दिली. तोंडाला मास्क बांधून तिघांनी त्यांना मारहाण केली.या घटनेनंतर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून निदर्शनं केली. सोबत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं.
वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.तालुक्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गौण खनिज पथकाची स्थापना केली आहे. या पथकात चालक डोईफोडे यांचा समावेश आहे. या पथकानं दाणेवाडी, पेडगाव, निमगाव खलूत कारवाई करुन वाहनं जप्त केली. याचाच राग धरुन डोईफोडेवर हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
