इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील धानुरी ते करजगाव या रस्त्यासाठी आलेला ७० लाखांपेक्षा जास्त निधी कागदोपत्री मेळ घालून संगणमताने हाडप करुन शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. धानुरी येथील शेतकऱ्यांनी धानुरी-करजगांव रस्त्याचा निधी हाडप करणा-यावर गुन्हे दाखल करुन तात्काळ रस्ता पाणंदमुक्त करावा अन्यथा जिल्हा परिषद समोर सामुहिक आत्मदहण करण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील धानुरी ते करजगाव या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे नावाखाली ७० लाखांपेक्षा जास्त निधी कागदोपत्री मेळ घालून संगणमताने हाडप करुन शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. परिणामी सदरील रस्ता अद्यापही पाणंदमुक्त झालेला नाही. आम्हाला धानुरी-करजगाव पाणंद रस्त्यानेच शेताकडे जावे लागते. पावसाळ्यात सततचा चिखल व शेतात पिकणारा शेतीमाल घेऊन येणेसाठी रस्ता नसल्याने आमचे हालहाल होत आहेत. सदरचा रस्ता पाणंदमुक्त करण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करीत आहोत. आपले कार्यालयासमोर ३० एप्रिल पासून आमरण उपोषणाला बसलो होतो. १ मे रोजी आपण त्रिसदस्यीय समिती गठीत करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सदर प्रकरणी वेळेत कारवाई होईल या अपेक्षेने आम्ही उपोषण मागे घेतलो होतो. परंतु समितीने राजकीय दबावामुळे १५ दिवसांत सदरील रस्त्याला भेटही दिलेली नाही. त्यामुळे आमचा विश्वास उडालेला आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर शासकीय रकमेचा अपहाराचा गुन्हा दाखल करावा व सदरचा रस्ता तात्काळ पाणंदमुक्त करण्यात यावा. आमच्या शेताकडे जाणारा रस्ता पावसाळ्यापुर्वी पाणंदमुक्त होणार नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी नाविलाजास्तव दिनांक २२ मे २०१८ रोजी जिल्हा परिषद समोर सामुहीक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर विठ्ठल बुरटुकणे, विजय साळुंके, गुंडु साळुंके, संभाजी मुसांडे, बबु देशमुख आदींच्या सह्या आहेत.
