आमिर खानतर्फे जलमित्र मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन





  • १ मे महाराष्ट्र दिनी १ लाखांहून अधिक लोक करणार महाश्रमदान 


२० एप्रिल २०१८ : यंदा १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी शहरवासीयांना मोठ्या संख्येने एकत्र येऊन काही क्षणांसाठी गावक-यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. पुण्यातील सिंबायोसिस युनिव्हर्सिटी येथे झालेल्या कार्यक्रमादम्यान बोलताना पानी फाऊंडेशनचे संस्थापक श्री. आमिर खान यांनी विद्यार्थी व सर्व शहरी नागरिकांना 'जलमित्र' बनण्याचे आणि दुष्काळाविरोधाच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. गावक-यांसोबत गावांमध्ये काम करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी आणि नागरिकांनी  jalmitra.paanifoundation.in या लिंकवर साइन-इन करून आपली नोंदणी करू शकतात. '१ मे महाश्रमदान' मध्ये नोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख २५ एप्रिल आहे.
गेल्या तीन आठवड्यांमध्ये जवळपास १ लाख लोकांनी जलमित्र म्हणून आपली नोंदणी केली आहे. वेळेअभावी जर आपणास १ मे रोजी महाश्रमदनात सह्भागी होता आले नाही तर, इच्छुकांनी पाणलोट व्यवस्थापन संरचना निर्माण करण्यासाठी पैशांची मदत करून किंवा स्वयंसेवेच्या माध्यमातून गावक-यांना काही निश्चित कामांमध्ये मदत करून आपले योगदान देऊ शकता. अधिक माहितीसाठी पानी फाउंडेशन च्या  www.paanifoundation.in  या वेबसाइटवर संपर्क साधू शकता. याप्रसंगी पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान म्हणाले, विद्यार्थी आणि तरुणांसोबत जोडले जाण्यासाठी मला एक व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मी सिंबायोसिस युनिव्हर्सिटीचा आभारी आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्याच्या या महान कार्यात महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी आमच्यासोबत यावे, असे मी आवाहन करतो. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आपण हा दिवस महाश्रमदान करून साजरा करूया आणि शहरे आणि गावांमधील दरी कमी करू या. आतापर्यंत जलमित्र अॅपवर आमच्याकडे १ लाख नोंदण्या झाल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला आणखी पाठिब्यांची अपेक्षा आहे. मी सर्वांना, प्रत्येकाला श्रमदान करण्याची आणि आपल्या राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी या जनआंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची विनंती करतो."२०१६ मध्ये आमिर खान व किरण राव यांनी सुरू केलेल्या 'पानी फाऊंडेशन' या ना-नफा तत्वावरील कंपनीने 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेचे आयोजन केले आहे. दरवर्षी पाणलोट व्यवस्थापनामध्ये सर्वोत्तम कार्य करणारे गाव ओळखण्यासाठी गावागावांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा म्हणजे जल-संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठीची जनमोहीम आहे. पानी फाऊंडेशन लोकांना पाणलोट व्यवस्थापनाच्या माहितीसंदर्भात प्रशिक्षण देते. त्यानंतर गावकरी सरकार व स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाच्या माध्यमातून आपापल्या गावांमध्ये विविध पाणलोट व्यवस्थापन कार्यांची योजना आखतात आणि त्यांची अंमलबजावणी करतात. पहिल्या दोन वर्षांमध्ये जवळपास १,५०० गावांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. ज्यामुळे जवळपास १०,००० कोटी लिटर्स पाण्याचा साठा निर्माण झाला. यंदा स्पर्धेच्या तिस-या वर्षामध्ये महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांमधील ७५ तालुक्यांतील ४,००० हून अधिक गावे सहभाग घेत आहेत. स्पर्धेतील सहभागी गावांपैकी राज्य पातळीवरील तीन अव्वल विजेत्या गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये आणि ४० लाख रुपये अशा बक्षीसांसह गौरविण्यात येईल. प्रत्येक तालुक्यामधील अव्वल गावाला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मे २०१८ दरम्यान राबवण्यात येईल. ही मोहीम हळूहळू विकसित होत आहे आणि गेल्या दोन वर्षांमध्ये शहरांमधील हजारो लोकांनी या प्रयत्नासाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
स्वयंसेवकांना विविध पद्धतीने या मोहीमेमध्ये सहभाग घेता यावा यासाठी पानी फाऊंडेशनने 'जलमित्र' हा उपक्रम सुरू केला. २२ मार्च २०१८ रोजी जागतिक जल दिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला. जगातील सर्व व्यक्ती jalmitra.paanifoundation.in या लिंकवर साइन-इन करून जलमित्र बनू शकते. १ मे रोजी महाराष्ट्रात सत्यमेव जयते वॉटर कपच्या सर्व ७५ तालुक्यांमध्ये 'महाश्रमदान' उपक्रम राबवण्यात येईल. गावातील व शहरातील लाखो नागरिक एकत्र येत जलसंपन्न महाराष्ट्रासाठी काम करणार आहेत. आमिर खान म्हणाला, त्याला विश्वास आहे की ग्रामीण व शहरी भागांचा हा सहयोग गावक-यांसोबतच शहरवासीयांना देखील लाभदायी ठरेल. त्यांना आपल्या शेतकरी बांधवांची स्थिती समजण्यासोबतच आपल्याला अन्न, पानी कशाप्रकारे मिळते याची देखील माहिती होईल. या उपक्रमामुळे शहरे व गावांमधील पोकळी दूर होईल आणि त्यांच्यामध्ये अत्यंत सलोख्याचे नाते तयार होण्यास मदत होईल. त्याने विद्यार्थ्यांना पानीटंचाई विरोधातील या लढ्यामध्ये सहभागी होण्याचे आणि समृद्ध व आनंदी महाराष्ट्रासाठी प्रयत्नांमध्ये मदत करण्याचे आवाहन केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post