माझा मळ्यातच जीव



रूप तुझ जागोजागी

मला शिवारी दिसत
भारावलं मन माझ
जागेपणी सपानत

रान मळ्याच हिरव
डुलतया वा-यावर
वाटे पांघरला त्यान 
तुझ्या शालूचा पदर

पानावरी टपटप
थेंब दवाचे पडती
तूच चालतेस वाटे
तुझी जोडवी वाजती

पाट भरला पाण्यान
वहातोय खळाळून
मला वाटती वाजती
तुझ्या पायीची पैंजण

बांधावरल्या बोरीची
बोरं पिवळी पिकली
तुझी  बोरमाळ कशी
सांग बोरीन घातली

खुंट केळीचा बघता
भास होतोय मनाला
तुझा बांधेसूद बांधा
बघ केळीन चोरला

लाल मिरच्याचे झाड
मला बघून हासले
लालेलाल ओठ तुझे
तू का मिरच्याना दिले

पलानीला गुलाबाचा
जवा ताटवा बघतो
तुझ्या कुंकवाचा टिळा
मला मळ्यात भेटतो

किती किती  मी सांगाव
माझ्या मळ्याच वैभव
तुझ्या परास गुंततो
माझा मळ्यातच जीव

तुकाराम पाटील
पिंपरी पुणे १७

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post