ढणढणत्या चुलीवर
आजी थापायची भाकरी.
मिरचीच्या खर्डासोबत
मायेनं वाढायची न्याहरी!!
आजी सांगे पोटतिडकिन
नको बाप्पा लांडीलबाडी.
सच्चाईन वाग सदा
नको कुणाची चूगलीचहाडी!!
बडवल्याशिवाय भाकरीला
येत नाही आकार.
भाजल्याशिवाय जगण्याला
चढत नाही धार!!
जेवतांना सांडू नये
कधीच उष्ट.
कोरभर भाकरीलाही
किती पडतात रे कष्ट!!
गरीबीची कधीच
वाटू नये लाज.
श्रीमंतीत कधी
दाखवू नको माज!!
कष्टान कमव राजा
आपली भाकर आर्धी.
खर्याभोवती जमत नाही
कधीच गर्दी!!
खरपुस भाजल्याशिवाय
लागत नाही भाकर गोड.
हरामाच्या तळहातावर
कधी नसतात रे फोड!!
सुरी आली मानेवर
तरी जाऊ नको शरण.
खर्याच्या आईला
नसते कधी मरण!!
आजी होती अडाणी
पण सांगायची तत्वज्ञान.
बोलायची तशी चालायची
उगळायची बणून सहान!!
किरण बागल.
लासलगाव.
