वाचकसंख्या घटत असल्याची खंत व्यर्थ : दिलीप भिकुले



 पुणे: दीर्घकाळापासून वाचकांची संख्या घटत असल्याची खंत व्यक्त केली जाते. नवी पिढी वाचनापासून दूर असल्याची नाराजी व्यक्त होते. मात्र ही खंत आणि नाराजी व्यर्थ असून केवळ वाचकांची अभिरुची आणि पद्धत बदलत आहे; याची जाणीव सार्वजनिक वाचनालय चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते दिलीप भिकुले यांनी करून दिली. ललित कला साहित्य मंचाच्या राज्यभरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात भिकुले बोलत होते. यावेळी किर्तनाद्वारे प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या कलावती सुर्वे; मंचाचे संस्थापक अध्यक्ष ललित कोलते; प्रियंका कोलते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. वाचन कमी होत असल्याने अनेक जुनी आणि नामांकित ग्रंथविक्री दालने बंद होत असल्याचे उदाहरण हल्ली दिले जाते. मात्र त्याच वेळी वाचकांना आकर्षित करण्याच्या अनेक अभिनव कल्पना घेऊन अनेक दालने कात टाकून विस्तारत आहेत. वाचक कट्टे वाढत आहेत; याकडे भिकुले यांनी लक्ष वेधले. वाचक ही आपल्या नवनिर्मिती; नवविचारांची प्रेरणा आहे. साहित्य म्हणजे विद्वत्ता आणि शब्दांचे फुलोरे नाही; तर अंत:करणाची साद आहे; याची जाणीव साहित्यिकांनी ठेवावी; अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. साहित्यिकांनी सतत जागरूक राहून जबाबदारीने साहित्यनिर्मिती करावी. आपल्या अभिव्यक्तीतून समाजात रोष नव्हे; तर सौहार्द निर्माण होईल असा कटाक्ष ठेवावा; असे आवाहन कलावती सुर्वे यांनी केले. 'साहित्यगंध' या नियतकालिकाच्या माध्यमातून सर्व भाषा व साहित्यप्रकारांच्या साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या साहित्य मंचाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी कोणतेही अर्ज; शिफारसपत्र मागविली जात नाहीत; तर साहित्यनिर्मिती आणि प्रसाराच्या कार्याची दखल घेऊन ही निवड केली जाते; असे ललित कोलते यांनी प्रास्ताविकात सांगितले. अतुल राऊत यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पांपटवार यांनी आभार मानले. दिनेश खैरे, राहूल भोसले, तनुजा इनामदार, अतुल राऊत, गणेश गव्हले, पुष्पांजली मराठे, गीता पांपटवार, उद्धव भयवाळ, अंजली बर्गे, चंद्रकांत खोसे, हरिश्चंद्र धिवार, अभिजीत देशमुख, निखिल पवार, सोनाली कुलकर्णी, कमलेश शिंदे, विजय गुंडेकर यांची वेगवेगळ्या जिल्ह्यांतून पदनियुक्ती करण्यात आली असून सन्मानपुर्वक प्रमाणपत्र यावेळी बहाल करण्यात आले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post