इकबाल मुल्ला
लोहारा :- लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात पंचायत समिती लोहारा यांच्या वतीने तालुकास्तरीय एकदिवसीय महिला महिला मेळावा घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती ज्योती पत्रिके ह्या होत्या. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श सरपंच राणी पाटील, उपसभापती अश्विनी पाटील, तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सहायक गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख, जि प सदस्या शोभा तोरकडे, तालुका महिला दक्षता समितीच्या वंदना भगत, पो कॉ. रोहिणी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आदर्श सरपंच राणी पाटील यांनी उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, महिलांनो, आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो परंतु त्यासाठी आत्मविश्वास व परिश्रम आवश्यक आहेत. त्यामुळे न डगमगता जिद्दीने काम करून यशस्वी व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना केले. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. लोहारा तालुका महिला दक्षता समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो महिलांमध्ये जनजागृती करून त्यांच्यात योग्य बदल घडवून आणल्याबद्दल महिला दक्षता समितीच्या वंदना भगत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच उमेद अंतर्गत उल्लेखनीय काम करणाऱ्या उत्कृष्ट प्रेरीका, उत्कृष्ट इंटरनेट सखी, उत्कृष्ट कृषी सखी, उत्कृष्ट व्यवसाय बचत गट, राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार, हागणदारीमुक्त प्रभाग संघ, उत्कृष्ट काम करणाऱ्या गटातील महिला यांच्यासह उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना विशेष पुरस्कार देण्यात आला. याच कार्यक्रमात तालुक्यातील महिला सरपंचांचा ही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी केले. यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन ही केले. सूत्रसंचालन शितल गोरे, आत्मलिंग उंबरे यांनी केले. सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या पर्यवेक्षिका, तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, बचत गटाच्या महिला यांनी परिश्रम घेतले.
