मूर्तिजापूर-येथील साहित्य क्षेत्रातील नामांकित व नवोपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'सृजन साहित्य संघाच्या' पहिल्या ग्रामीण शाखेचे उद्घाटन नुकतेच सांगवी येथील मारोती देवस्थानच्या प्रशस्त सभागृहात पार पडले.ग्रामीण भागातील तरुणांना लिहीते करून,त्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा व तरुणपिढीने सकारात्मक विचार करुन साहित्याच्या माध्यमातून समाज व देशविकासाचा विचार करावा या प्रयोजनातून या शाखेची निर्मिती करण्यात आली.
कार्यकारणीमध्ये,रुक्मांगत देवतळे अध्यक्ष,निवृत्ती खोकले उपाध्यक्ष,आकाश खोकले सचिव,अक्षय पखाले सहसचिव,मनोज खोकले कोषाध्यक्ष,मुकुंद खोकले प्रसिध्दीप्रमुख,सौरभ मोरे सदस्य हयांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारणीतील पदाधिकारी व उपस्थित कविंच्या स्वागतानंतर बहारदार कविसंमेलनाला सुरूवात झाली. रवींद्र जवादे,प्रमोद पंत,विनोद महल्ले,शैलेश गिरी,विलास वानखडे,विष्णु लोडम, बाळू बेलखेडे,निलीमा आष्टीकर,मिना जवादे हयांनी,निसर्ग,शेती,शेतकरी,राजकारण हयासारख्या विषयांवर मार्मिक कविता सादर केल्या. त्याचप्रमाणे ईश्वरी मोरे,यश खोकले,समर्थ मोरे हया बालकविंनीही आपल्या कविता सादर करुन कविसंमेलनात रंगत आणली.सदर कविसंमेलंनाचे संचालन रवींद्र जवादे यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश गिरी यांनी केले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिक,महिला,तरुण व बालमंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
