![]() |
- वीर जवान, शहिदांच्या सन्मानार्थ कार्यक्रम
- शहिदांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा
मुंबई, दि. ३१ :- भारतात शौर्य आणि त्यागाची पूजा केला जाते. त्यामुळे आपल्या
स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान करणाऱ्या वीर जवान आणि शहिदांकडून युवा पिढीने
प्रेरणा घेऊन भ्रष्टाचार, अनाचार आणि अत्याचाराविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करावा,
असे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. अथर्व फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘वन फार ऑल, ऑल फार वन’ या वीर जवान आणि
शहिदांच्या कुटुंबियांच्या सन्मानार्थ आयोजित ट्रिब्युट टू आर्मी ॲण्ड सॅल्यूट टू
सोल्जर्स कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहिदांच्या
कुटुंबियांना शासनाकडून पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणाही केली. एनएससीआयच्या
स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास आसामचे
राज्यपाल जगदिश मुखी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व नौकानयन मंत्री नितीन गडकरी, परमवीर चक्र शौर्यपदक
प्राप्त नायब सुभेदार संजयकुमार, महावीर चक्र पदक प्राप्त निवृत्त विंग कमांडर जगमोहन नाथ,
परमवीर चक्र पदक
प्राप्त निवृत्त कॅप्टन बानासिंग, आमदार आशिष शेलार, कार्यक्रमाचे संयोजक अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल
राणे, क्रिकेटपटू
कपिल देव, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले,अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, चित्रपट निर्माता दिग्दर्शक मधुर
भांडारकर, डी.वाय.पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, अभिनेता नील नितीन मुकेश,
आफताब शिवदासानी,अमिषा पटेल, सोनल चौहान आदींची
उपस्थिती होती.मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हणाले की, भारतात मान-सत्ता-धन यांची पूजा
केली जात नाही, तर शौर्य आणि त्यागाची पूजा केली जाते. देशासाठी आपल्या प्राणाची बाजी
लावणाऱ्या वीर जवानांचाही पूजा केली जाते. या वीर जवानांच्या शौर्याच्या गाथा या
नेहमीच अतुलनीय अशाच असतात. त्याच्या या शौर्याची गाथा सर्वांपर्यंत पोहचविण्याची
गरज असते. अशा कार्यक्रमातून या शौर्य गाथा आपल्यापर्यंत पोहचतात. युवा पिढीने या
गाथांतून त्याग आणि समर्पणाची प्रेरणा घेणे आवश्यक आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनातही
भ्रष्टाचार, अनाचार आणि अत्याचाराविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करावा. शहिदांच्या जीवनाची
प्रेरणा घेऊन, देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले शहिदांच्या बलिदानाचे
मोल कधीही करता येणार नाही, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी
शहिदांच्या कुटुंबियांना वीस लाख रुपये देण्यात येत होते. त्यामध्ये वाढ करून,
आता पंचवीस लाख
रुपये देण्यात येतील, अशी घोषणाही केली केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, शहिदांच्या आणि
त्यांच्या कुटुंबियांच्या ऋणातून कदापिही उतराई होता येणार नाही. देशाच्या
सर्वांगीण विकासात वीर जवानांच्या सीमेवरील कर्तृत्वाचे योगदान निश्चितच मोठे
असते. त्यामुळे इतिहास लिहिताना त्यांचा उल्लेख निश्चितच करावा लागतो. त्यामुळे
अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाचे आणि बलिदानाचे स्मरण करता
येते. यातून आपण राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करण्यास सज्ज होऊ या. अन्य कुठल्याही
बाबींपेक्षा देश श्रेष्ठ हे ध्यानात घेऊन, एकता आणि अखंडतेसाठी काम करू या. आसामचे
राज्यपाल मुखी यांनीही आपल्या भाषणात शहीद कुटुंबियांप्रती सन्मानाची भावना
संवर्धित करण्यासाठी स्वयंसेवी संस्था संघटनांनी पुढे येण्याचे आवाहन केले. सुरवातीला
अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. राणे यांनी प्रास्ताविक केले. लेफ्टनंट जनरल
विश्र्वंभर सिंह यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास तीनही सेना दलातील वीर जवान,
त्यांचे कुटुंबिय,
तसेच शहिदांचे
कुटुंबीय आदींसह राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्र, विविध महाविद्यालयांचे
विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
