अपघात टाळण्यासाठी वाहतुकीला शिस्त लावावी -- खासदार संजय धोत्रे


* जिल्हाधिकारी अभिनित ‘हेल्मेट’ लघुपटाचे विमोचन
* रस्त्यांतील अतिक्रमण, अडथळे हटवा
* वर्दळीच्या रस्त्यांवर खाजगी बस, ट्रक उभ्या करु नयेत
* ध्वनी प्रदुषण मुक्त शहराबाबत जनजागृती करावी
नीलेश सुखसोहले
अकोला, दि. 23 --- वाढते अपघात टाळण्यासाठी व वाहनांना शिस्त लावण्यासाठी पोलीस विभाग, उप प्रादेशिक परिवहन विभाग आणि मनपाने संयुक्तपणे कार्यवाही करावी. अकोला शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात यावीत. अडथळे दूर करण्यात यावेत, अरुंद रस्ते आणि वर्दळीच्या रस्त्यांवर  ट्रक, लक्झरी बस उभ्या करु देऊ नयेत, मुख्य रस्त्यांवर दुभाजक लावावेत, रस्त्यांवरील खडडे बुजवावेत, वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावावी,  असे निर्देश खासदार संजय धोत्रे यांनी आज रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष या नात्याने संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज सदर बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अशोक अमानकर आदींसह समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
 हेल्मेटबाबत संदेश देणारे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय अभिनित ‘हेल्मेट’ या लघुपटाचे आणि पोस्टरचे  याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. डॉ. राजेश  देशमुख यांनी हा लघुपट तयार केला आहे.
दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे, याला आळा घालण्यासाठी प्रभावी उपायांची अमलबजावणी तातडीने करणे गरजेचे आहे, असे सांगून खासदार संजय धोत्रे म्हणाले की, सुरक्षित वाहतुकीबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. शहरातील गर्दीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याबरोबरच रस्ते हॉकर्स मुक्त करावेत. सुरक्षेसाठी पोलीस विभागाने एका पोलीस उपनिरीक्षकाची  नेमणूक करावी. संवेदनशील भागांमध्ये मोठया वाहनांना उभे राहण्याची परवानगी देऊ नये. मुख्य रस्त्यांवर दुभाजक बसवावेत. रस्त्यांवर पिवळया पटटयांची मार्किंग करावी. खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस लक्झरी बसस्टँडच्या परिसरातच उभ्या राहतील, अन्यत्र उभ्या करण्यात येणाऱ्या बसेसवर कार्यवाई करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांचा ध्वनी प्रदुषण मुक्त शहराचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा, यासाठी जनजागृती करण्यात यावी.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांनी ‘वाहतुक सजगता मोहिमे’बाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. ही मोहिम अकोल्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post