बलशाली भारतासाठी योग ही जीवनपध्दत बनवा - स्‍वामी रामदेव महाराज





  • स्वामी  रामदेव यांनी देशाच्या मानसिक स्‍वास्‍थ्‍याला सुदृढ केले -  पंकजा मुंडे

सन 2050 मध्ये सुदृढ दोन पिढयांचा बलाढय भारत बघायचा असेल, तर उत्तम आरोग्यासाठी घराघरात योग ही जीवन पध्दत झाली पाहिजे. आमची संस्कृती, आमचे पूर्वज, आमचे प्राचीन आयुर्वेद आणि योगविद्या आम्हाला जगामध्ये सर्वोच्च स्थान बहाल करेल. त्यामुळे घराघरातील महिलांनी आहार,संसार, विचार व व्यवहार या चर्तुसूत्रीला योगाच्या माध्यमातून अंमलात आणावे, असे आवाहन योगगुरु स्‍वामी रामदेव महाराज यांनी केले.चंद्रपूर तालुक्यातील मूल येथे 20, 21 व 22 असे तीन दिवस स्‍वामी रामदेव महाराज यांचे योगाभ्यास शिबीराचे आयोजन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. काल मंगळवारी मुल येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. आज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित केलेल्या या महिला मेळाव्याला मोठया संख्येने मातृशक्ती उपस्थित होती. सतत दोन तास योग विद्येचे प्रशिक्षण आणि नव्या पिढीला संस्कारक्षम बनविण्यासाठी करायच्या संस्काराला यावेळी बाबा रामदेव यांनी विषद केले. आहार,संसार, विचार आणि व्यवहार यामध्ये आपल्या प्राचिन सभ्यतेचा उपयोग करुन सद्याच्या व येणा-या पिढीला सुदृढ, विचारशील, व्यवहारिक आणि सुसंस्कृत बनविण्याचे सर्व सूत्र महिलांच्या हाती आहे. त्यासाठी त्यांनी स्वत: उत्तम आरोग्याचे धनी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी महिलांना रोजच्या जीवनचक्रात सहजपणे करता येणा-या अनेक योगाचे प्रात्यक्षिक दिले. चंद्रपूरातील हजारो महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर वित्‍त व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री ना. पंकजा मुंडे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, माजी मंत्री संजय देवतळे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी आदी उपस्थित होते. रामदेव यांनी यावेळी गेल्या 27 वर्षात त्यांच्या निरोगी व सुदृढ शरीराच्या मागे योगाचा नियमित सराव असल्याचे सांगितले. देशाला महासत्ता बनवायची असेल तर देशातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक दृष्टी ठेऊन रोज 18 तास काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी महिला आणि भगीनींनी योग शिक्षणाचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा. या शास्त्राचा प्रचार प्रसार करावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी महिलांना होणारे आजार, हिमोग्लोबीनची कमतरता, याशिवाय चुकीचे सौंदर्य प्रसाधने वापरल्याने होणारे परिणाम आणि त्यावर कोणत्या योगासनाची व वनौषधीची मात्रा लागू पडेल याचे मार्गदर्शन केले. संपूर्ण घराच्या आहाराची जबाबदारी  सांभाळणा-या महिलांनी आपल्या घरातील नास्ता,दुपारचे व रात्रीचे जेवण काय असावे यापासून तर त्यांनी स्वत: कशी आरोग्याची काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले. सोबत अनेक योगासनांची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. या भागातील शेतक-यांना पतंजली उद्योग, समूहाशी जोडण्याचा पुनरूच्‍चार त्यांनी केला. वनौषधीचे उत्पन्न घेण्याचे आवाहन करतांना मिहान येथील प्रकल्पामुळे विदर्भातील एकही संत्रा फळ शिल्लक राहणार नाही, एवढी मागणी निर्माण होईल, असे स्पष्ट केले.या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेणारे जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बाबा रामदेव यांना चंद्रपूर जिल्हयाची वैशिष्टये व वेगळेपण लक्षात आणून दिले. जिल्हयातील महिलांच्या उत्तम आरोग्याच्या अपेक्षेने आजचा हा मेळावा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. घरामधील महिलांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे. त्यांनी स्वत: देखील संसाराचा डोलारा सांभाळतांना निरोगी निरामय जीवन जगावे, यासाठी स्‍वामी रामदेव यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. विविध योजनांमधून जिल्हयात महिलांचा सहभाग वाढत असून त्यांच्या गाठीला पैसा यावा,यासाठी जिल्हयामध्ये बचत गटांची चळवळ गतीशील करण्यासाठी आम्ही संकल्पबध्द आहोत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी संबोधीत करतांना स्‍वामी रामदेव हे ऋषी आणि कृषी या संस्कृतीचे आधुनिक प्रतिनिधी असून त्यांनी महिला सक्षमीकरणाला बळकटी दिली आहे. जिल्हयातील महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी स्‍वामी रामदेव हे योग्य मार्गदर्शक आहे, असेही ते म्‍हणाले.या कार्यक्रमाला खास मुंबईवरुन चंद्रपूरला आलेल्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बाबा रामदेव यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाला संपूर्ण देश सलाम करीत असून त्यांच्यामुळे आमच्या पूर्वजांच्या योगशास्त्राला उजाळा मिळाला आहे. त्यांनी आमच्या वनौषधीला चांगले दिवस आणले असून या देशाच्या मानसिक स्‍वास्‍थ्‍याची बांधणी केली आहे. त्यांनी बीड जिल्हयातील कार्यक्रमाचे निमंत्रण स्विकारावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खास महिलांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. महिला व बालविकास विभागाच्‍या योजनांच्‍या पाठिशी निधीसाठी खंबीरपणे उभा राहणारा अर्थमंत्री भाऊ म्‍हणजे सुधीरभाऊ असा गौरवोल्‍लेख पंकजाताई मुंडे यांनी केला.   या कार्यक्रमाचे संचालन सुधाताई मोरे व राखी कंचर्लावार यांनी केले.

खोज शोध नाविन्यांचा उपक्रमाचा शुभारंभ.
या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून आलेल्या समुदयासमोर जिल्हा प्रशासनाने चंद्रपूरच्या परिवर्तनासाठी आखणी केलेल्या नाविण्यपूर्ण कल्पनामागण्याच्या खोज शोध नाविन्यांचा या उपक्रमाची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्ते केली. शेती, उपजीविका विकास, पर्यटन विकास, प्रशासन प्रक्रियेतील सुधारणा या चार क्षेत्रामध्ये दोन गटात ही स्पर्धा होणार असून जिल्हयातील व जिल्हा बाहेरील नागरिकांच्या भन्नाट कल्पनांना या उपक्रमातून जिल्हा प्रशासनाने आमत्रित केले आहे. या संदर्भातील अधिक माहिती हॅलो चांदा या पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेच्या 1800 266 4401 या टोल फ्रि क्रमांकावर मिळणार आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी या संदर्भातील भूमिका यावेळी मांडली. व्यासपीठावरील मान्यवरांनी यावेळी या स्पर्धेच्या घडीपुस्तिकेचे विमोचन केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post