अकोला जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील



निलेश 
अकोला, दि. 26 – अकोला जिल्हा शैक्षणिक, सांस्कृतिक,औदयोगिक व सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती करीत असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी दिली. शहरातील शास्त्री स्टेडियम येथे जिल्हा मुख्यालयाचे ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदींसह स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, सर्व विभागांचे अधिकारी, पत्रकार, शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, जिल्‍हयातील जलसाठयांचे स्त्रोत बळकट करण्यासाठी तसेच पाणी टंचाई पासून मुक्तीकरीता महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान जिल्हयात अत्यंत प्रभावीपणे राबविले जात आहे. मागील दोन वर्षांत झालेल्या कामांमुळे 51,268 हेक्‍टर जमिन एकपाळी सिंचनाखाली व 26,815 हेक्‍टर जमिन पूर्ण सिंचनाखाली आली आहे. चालू वर्षात जलयुक्त शिवार अभियानासाठी 144 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये देखील कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच धडक सिंचन विहीरी योजनेअंतर्गत एकुण 5434 विहिरींपैकी 4612 विहिरींचे काम पूर्ण होत आलेले असून उर्वरीत विहिरी पूर्ण करण्‍याची कार्यवाही सुरु आहे. जिल्‍हयात एकुण 5 हजार शेततळे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घेऊन शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सोय करावी. जिल्हयातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या केळी उत्पादनाकरीता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्‍यांना शासनाच्‍या गटशेती योजनेचा लाभ पण दिला जाणार आहे. मुख्‍यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 25.10 कि.मी लांबीच्‍या रस्‍त्‍यांची कामे पूर्ण झाली आहेत, असे सांगून ते पुढे म्हणाले की, कृषी पंप उर्जिकरणासाठी प्राप्‍त झालेल्‍या निधीतून एकुण 5005 पंपांचे उर्जिकरण करण्‍यात आले आहेत. तसेच उर्वरित व प्रलंबित असलेल्‍या कृषीपंपांना वीजपुरवठा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येणार आहे.

बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकोला ते खंडवा रेल्वे मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेज करण्याचे काम युध्‍द पातळीवर सुरु आहे. नागरिकांच्‍या अद्ययावत आरोग्‍य सुविधेसाठी सुपर स्‍पेशालिटी हॉस्‍पीटल चे बांधकाम प्रगतीपथावर आहे. दर सोमवारी सुरु करण्यात आलेल्या जनता दरबारमुळे सामान्य नागरिकांच्या समस्या त्वरीत सुटण्यास मदत झाली आहे. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे अनेक तक्रारींचा निपटारा जलदगतीने होत आहे. आरोग्य सेवा विषयक समस्या निवारणासाठी जनता आरोग्य दरबारही सुरु करण्यात आला आहे. याचाही नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र सुध्दा कौशल्य प्रशिक्षण व विकासाला प्राधान्य देत असून कुशल महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र हे विधान पूर्णत्वास येत आहे. राज्य सरकार विविध उदयोग उपक्रमांसोबत कौशल्ययुक्त मनुष्यबळ पुरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
मा. पंतप्रधानांच्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानाची अकोला जिल्‍हयात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. लोकसहभागातून मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला पुढाकार व त्‍याला लाभलेला उत्‍स्‍फुर्त जनसहभाग हा निश्चितच कौतुकास्पद व भूषणावह आहे. एखादया सार्वजनिक कार्यासाठी एवढया मोठया संख्‍येने लोकांनी एकत्र येण्याची ही जिल्‍हयातील पहिलीच घटना असावी. आपला जिल्हा सार्वजनिक स्वच्छतेत अग्रक्रमावर नेण्यासाठीही नागरिकांनी असेच योगदान दयावे, असे त्यांनी सांगितले

.
शहरातील गरीब मुलामुलींना खाजगी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे व त्यांची शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून महानगरपालिका शाळांमध्ये ई-लर्निंग क्लासेस सुरु करण्यात आले आहेत. तसेच बॉक्सींग हॉलचे कामही पूर्ण झाले असून सांस्कृतिक भवनाचे काम प्रगतीपथावर आहे आणि सामाजिक न्याय भवनासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे सांगून ते म्हणाले की, 73 व 74 व्या घटना दुरुस्तीस 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मा. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. आपणही या मोहिमेत सहभागी होऊन लोकशाही बळकट करण्‍याकरिता आपले योगदान द्यावे. महसूल विभागामार्फत वितरीत करण्यात येणारे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ऑनलाईन डिजीटल पध्दतीने वितरीत करण्यात येत असून पारदर्शक व गतीमानतेने सदर प्रमाणपत्रे विदयार्थ्यांना मिळत आहेत. तसेच जिल्‍हयातील ई-म्‍युटेशन चे काम पूर्ण झाले असून या कामात अकोला जिल्‍हयाने उल्‍लेखनीय कामगिरी केली आहे. येत्‍या वर्षभरात अकोला स्‍त्री रुग्‍णालयातील खाटांची संख्‍या 300 वरुन 500 करण्‍याबाबत व आकोट येथे 100 खाटांचे सुपरस्‍पेशालिटी हॉस्‍पीटल बांधण्‍याबाबत पाठपुरावा करण्‍यात येणार आहे. तसेच अकोला येथे स्‍पीनींग हब व टेक्‍सटाईल पार्क उभारण्‍याचा, शेतकरी मॉल तयार करण्‍याचा, जिल्‍हयातील भाजीपाला उत्‍पादक शेतक-यांना आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठ उपलब्‍ध करुन देण्‍याचा, ध्‍वनी प्रदुषण विरहित रस्‍ते करण्‍याचा तसेच वाळू लिलावांतर्गत वाळू वाहतूक वाहनाला कलर कोड देण्‍याचा व या सर्व वाहनांची नोंदणी जिल्‍हा खनिकर्म अधिकारी कार्यालयात करण्‍याबाबतचा आणि गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शिवार योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍याचा संकल्‍प प्रशासनाने केला आहे. प्रगतीकडे वाटचाल करत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित असणेही महत्वाचे आहे. शांतता व सलोख्याचे वातावरण राहावे, यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य असणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे जिल्हयात गुन्हेगारीला आळा बसला आहे, असे त्यांनी सांगितले.

 
या प्रजासत्ताक दिनात पोलीस दल, राज्य पोलीस प्रशिक्षण विभाग, गृहरक्षक दल पुरुष व महिला यांचे पथक,एन.सी.सी. पथक,वाहतूक शाखा पोलीस दल यांचे पथक,भारत स्काऊट आणि गाईड यांचे पथक,बॅन्ड पथक,श्वान पथक,दंगल नियंञण पथक,अग्नीशमन दल पथक,अंबुलन्स यासह, सर्व शिक्षाअभियान स्वच्छ भारत अभियान, आरोग्य विभागाचे जनजागृती चिञरथ यांनी संचलन केले. विविध शाळांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची प्रशंसा मिळविली. महाराष्ट्र कन्या शाळेने विविध राज्यांच्या लोकनृत्याचे प्रभावीपणे केलेले सादरीकरण सर्वांसाठी आकर्षण ठरले. त्यानंतर पालकमंत्री यांनी उपस्थित स्वातंञ्यसंग्राम सैनिकांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांच्या अडीअडचणी ऐकूण घेतल्या. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर व पञकारांना प्रत्यक्ष भेटून त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन जिल्हा गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट कार्याबददल जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, खेळाडू, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी, शारीरिक शिक्षण शिक्षक, आर.एस.पी. शिक्षक, पोलीस यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक प्राप्त पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या विशेष कामगिरीबाबत पोलीसांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विविध शाळांच्या विदयार्थ्यांनी कवायती सादर केल्या. संकल्प प्रतिष्ठान ढोल-ताशाचे सादरीकरण केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post