मुंबई, दि. 26 : प्रवाशांना अत्याधुनिक व चांगल्या सुविधा देण्याबरोबरच स्वच्छ रेल्वे स्थानके करण्यासाठी रेल्वेची यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ते आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित प्रवाशांसाठीच्या विविध सुविधांच्या ई-लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आजच्या प्रजासत्ताक दिनी रेल्वेने चांगल्या विकास कामांचा शुभारंभ केला आहे. गेल्या तीन वर्षात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेने मोठी झेप घेऊन प्रवाशांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. नेरळ-माथेरान ही रेल्वे पर्यटकांचे आकर्षण आहे. तिच्यामध्ये आत्याधुनिक यंत्रणा बसवून ती पुन्हा सुरु केली आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर 26 अतिरिक्त फेऱ्या सुरु करुन प्रवाशांना दिलासा दिला आहे. विविध ठिकाणी पादचारी पूल एस्केलेटर्स, जिने, लिफ्ट, आतकालीन वैद्यकीय कक्ष, बुकिंग कार्यालय, वाईफाई सेवा, 52 स्थानकांवर एल.ई.डी. लाईटिंग अशा अनेक अत्याधुनिक सेवा सुविधा प्रवाशांना देऊन रेल्वेने आधुनिकतेकडे वाटचाल सुरु केली आहे. येत्या काळात स्वच्छ रेल्वे स्थानके पहायला मिळतील. रेल्वे स्थानकांचा चेहरा मोहरा बदललेला असेल. सिएसटी-पनवेल आणि चर्चगेट-विरार दरम्यान इलेव्हेटेड कॉरिडोर मार्ग लवकरच सुरु करणार आहोत. त्यामुळे प्रवाशांना वेळ वाचून अत्याधुनिक सुविधा मिळेल. अलीकडेच रेल्वेने वातुनुकुलीत रेल्वे सेवा सुरु करुन प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा प्राप्त करुन दिली आहे. वाहनांच्या प्रचंड वाहतुकीमुळे प्रदुषण वाढत असताना प्रवाशांनी रेल्वेचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, नेरळ, टिळक नगर आणि सांताक्रुझ स्थानकांवर पादचारी पुल, विद्याविहार स्थानकावर पादचारी पुलास अतिरिक्त जिना, लोअर परळ आणि बोरीवली स्थानकांवरील पादचारी पुलाचा विस्तार, ठाणे आणि दादर स्थानकांवर एस्केलेटर्स, दादर, मानखुर्द, रे रोड आणि बोरीवली स्थानकांवर लिफ्ट, ग्रँट रोड, विरार कार शेड, लोअर परळ आणि माहीम येथे सौर ऊर्जा संयंत्र, गोवंडी आणि टिटवाळा स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, किंग्ज सर्कल स्थानकांवर बुकिंग कार्यालयाचे ई-उद्घाटन करण्यात आले. मध्य रेल्वेवरील 52 स्थानकांवर 100% एल.ई.डी. लाईटिंग, एलफिन्सटन रोड स्थानकावर पादचारी पुलास अतिरिक्त जिना, बडाळा रोड आणि बदलापूर स्थानकांवर वाई-फाई सेवेचे ई-लोकार्पण करण्यात आले. मध्य रेल्वेवर 26 अतिरिक्ति उपनगरीय सेवांची रिमोटद्वारे तसेच अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह नेरळ आणि माथेरान दरम्यान रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून पुन:सुरुवात करण्यात आली.यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, खा.किरिट सोमय्या, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.