टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय


नीलेश सूखसोहळे
अकोला, दि. 30 -  मागील वर्षी कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी टंचाई आराखडयानुसार प्रस्तावित केलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सदरनिर्देश दिले. प्रारंभी आमदार बळीराम सिरस्कार यांनी बाळापूर व पातुर तालुक्यात टंचाई निवारणासाठी जलदगतीने उपाययोजना करण्याबाबत सांगितले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, भूजल सर्व्हेक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी बैठकीच्या सुरुवातीला टंचाई निवारणार्थ ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचा आढावा घेतला. त्यानंतर जानेवारी ते जून-2018 या कालावधीत टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडयात कोणत्या बाबी प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत, याबाबतची माहिती तालुकानिहाय तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. टंचाई निवारण कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, शासनाकडून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येईल,असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सरंपच,तलाठी, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन गावातील टंचाई परिस्थितीचा आढावा घ्यावा.

कोणत्या उपाययोजना करण्यात येतील, याचा सुधारीत टंचाई आराखडयात समावेश करावा. गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आराखडा मंजुरीसाठी तहसिलदारांमार्फत प्रशासनाकडे सादर करावा. तात्पुरती पुरक नळ योजना, नळयोजना विशेष दुरुस्ती ही कामे प्राधान्याने आराखडयात समाविष्ट करावीत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने आलेले प्रस्तावाचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रक्रीया तातडीने पूर्ण करावी. तसेच भूजल सर्वेक्षण विभागाने प्रस्तावानुसार केलेल्या सर्वेक्षणान्वये दिलेल्या अहवालानुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने कामाचे कार्यादेश काढावेत. या कामांमध्ये कुठल्याही प्रकारे दिरंगाई होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
प्रस्तावित कामांमध्ये विहिर खोलीकरण, गाळ काढणे, विंधन विहिरी, विहीर अधिग्रहण करणे, टँकरव्दारे पाणी पुरवठा, नळ व कुपनलिका दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना, नळयोजना विशेष दुरुस्ती याबाबींचा समावेश असून ग्रामीण भागातील संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी 26 कोटी 85 लक्ष 38 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
अकोला शहरात संभाव्य टंचाई निवारणासाठी उपाययोजना करण्यात आल्या असून सुमोर 4 कोटी 23 लक्ष रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post