सामाजिक बांधिलकी हा पत्रकारितेचा आत्मा: एस. एम. देशमुख


उदगीर :- पत्रकारीता हे एक व्रत आहे, तर सामाजिक बांधिलकी हा त्याचा आत्मा आहे. कोणाचेही कितीही दडपण आले तर पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी सोडू नये असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी केले. 
उदगीर येथील राघूकुल मंगल कार्यालयात उदगीर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात देशमुख बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार सूर्यप्रकाश धूत, जीवनधर शहरकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघाचे अध्यक्ष विनोद उगीले होते. व्यासपीठावर अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस अनिल महाजन, विभागीय सचिव विजय जोशी , नरसिंह घोने यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना श्री. देशमुख म्हणाले की, पत्रकार समाजासाठी सर्वस्व अर्पण करतो पण समाजानेही पत्रकारांच्या पाठीमागे उभे राहणेे जरूरी असून पत्रकारिता भांडवलदारांच्या हाती गेल्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जात नाही. पत्रकारांवर विविध कारणांमुळे राज्यातच नाही तर देशभरात हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे, शिवाय खोटे गुन्हे दाखल करुन पत्रकारांना अडचणीत आणण्याचे काम चालू आहे. या परिस्थितीत आपसात भांडण करीत न बसता सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन या प्रवृत्तीच्या विरोधात लढा देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. सरकार आज राज्यातील छोटी वर्तमानपत्र अडचणीत आणण्याचे काम करीत आहे. ही वर्तमानपत्रे बंद करुन माध्यमे भांडवलदारांच्या हाती सोपविण्याच्या कारस्थान चालू आहे. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांच्या सुखदुःखात सहभागी होणारी संस्था असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न या संस्थेने ऐरणीवर घेऊन काम सुरू केले आहे. पत्रकारावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू अशी ग्वाही त्यानी यावेळी दिली.
प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोपाळ जोशी यांच्या कलसंचाने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक सचिव अशोक कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विभीषण मद्देवाड, सुनील हवा यांनी केले. आभार श्रीनिवास सोनी यांनी मानले.
     या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार अनंत अपसिंगेकर,चंद्रचकोर कारखाने,सुरेश पाटिल नेत्रगावकर ,व्ही. एस. कुलकर्णी,प्रवीण जाहुरे, अर्जुन जाधव,इरफान शेख, विक्रम हलकिकर,संजय शिंदे,विनोद मिचे,अड़ माने, विश्वनाथ गायकवाड़,निवर्ती जवले, संगम पटवारी,सचिन शिवशेट्टे,राजीव किनिकर,बसवेश्वर डावले, रवि हसरगुंडे,माधव घोने, सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रभुदास गायकवाड, सुनील मादले, माधव रोडगे, नागेंद्र साबने, शाहुराज किवंडे, भागिरत सगर, रामबिलास नावंदर, श्रीपाद सिमन्तकर,न्यानेश्वर उजलम्बकर,बाबासाहेब सूर्यवंशी,माधव अनवले , शैख अज़रुदीन,अशोक तोंडारे यांच्यासह सर्व पत्रकारा सह शाहरातिक मान्यवार  उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post