पत्रकारांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी समिती गठीत


अकोला, दि. 24 --  जिल्हयातील पत्रकारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरे निर्माण करण्याकरीता तसेच पत्रकार गृहनिर्माणकरीता शहरालगत शासकीय जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करुन घेण्यासाठी  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने तहसिलदार, अकोला यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.  समितीची रचना पुढील प्रमाणे आहे, अध्यक्ष – राजेश्वर हांडे, तहसिलदार, अकोला, सदस्य-संदिप गावंडे, नगर रचना विभाग, मनपा, अकोला, पत्रकारांचे प्रतिनिधी-गजानन सोमाणी, दै. मातृभमी, संजय खांडेकर, दै.लोकमत. ज्यांना स्वत:चे हक्काचे घर नाही, त्यांच्यासाठी  शासन विविध योजना (PMAY, RAY, SAY) राबवत आहेत. देशाचे एक सामान्य नागरिक म्हणून या योजनेत पत्रकारांना घरकुलाचा लाभ देण्याकरीता जागा उपलब्ध करुन देण्याबाबत वारंवार  मागणी होत आहे. तसेच या कामाकरीता शासकीय जागा निवड करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सदर योजनेत पात्र असलेल्या पत्रकारांना लाभ देण्याबाबत विलंब होत असल्याची बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सदर समिती स्थापन केली आहे.या समितीने लवकरात लवकर जागा पाहणी करुन सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता करुन अहवाल उपविभागीय अधिकारी, अकोला यांच्याकडे सादर करण्याचे  आदेशात नमूद करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post