भंडारा, दि.19 :- प्रत्येकालाच जीवन जगतांना स्पर्धेला सामोर जावे लागते. विद्यार्थी म्हणून जीवन जगतांना नानाविध स्पर्धा द्याव्या लागतात. स्पर्धेच्या या युगात कुणी जेता तर कुणाच्या वाटयाला अपयश येते. सर्वच जिकंणारे असतात असे नाही, जेता असतो तो आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करतो. परंतु अपयशी होणारा जल्लोष करीत नाही. यापुढे ही मानसिकता बदलली पाहिजे. अपयशी होणाऱ्यानेही आनंद साजरा करायला हवा, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन आमदार. रामचंद्र अवसरे यांनी केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय भ्ंडाराद्वारा आयोजित चाचा नेहरु बाल महोत्सवात उदघाटनपर भाषणात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बालक हा वातावरणातून घडत असतो, बालकाच्या शारिरिक, बौध्दीक व मानसिक विकासासाठी सुयोग्य वातावरण मिळणे आवश्यक आहे. शासकीय व स्वयंसेवी संस्थेमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार बालकांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तीन दिवसीय बाल महोत्सावाचे आयोजन स्थानिक शिवाजी स्टेडियम भंडारा येथे करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी बालकांना खेळाचे महत्व पटवून देत बाल महोत्सवात सर्वांनी संघ भावना निर्माण करुन खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष बाल कल्याण समिती भंडारा डॉ. विशाखा गुप्ते यांनी उपस्थित मुलांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. बालगृहात पुनर्वसनासाठी दाखल विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. स्वयंसेवी संस्थांच्या संचालकांवर फार मोठी जबाबदारी असून त्यांना चोविस तास पालकांची भूमिका बजवावयाची आहे. निराधार, अनाथ मुलांवर संस्कारांची उणीव भासायला नको, विकासाची नवी संधी त्यांना या बाल महोत्सवातून प्राप्त होवो, असा आशावाद त्यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला. तत्पूर्वी प्रास्ताविकातून बाल महोत्सव अयोजन करण्यामागचे उद्दिटय व महत्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद डाबेराव यांनी पटवून दिले. यावेळी मंचावर जिल्हा परिविक्षा अधिकारी ए.ए. भोयर, सहाय्यक लेखा अधिकारी पी.ए. गिरडकर, नागपूरचे परिविक्षा अधिकारी एच.आर. सवई उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संरक्षण अधिकारी सी.एच. लोथे व शुभांगी कोल्हे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संरक्षण अधिकारी विलास भेंडारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीविक्षा अधिकारी एम.एम. आंबेडोरे, संरक्षण अधिकारी एस.डी. माहुरे, विधी सल्लागार एस.एल. धानकुटे, डी.बी. महाकाळकर, डी.डी. रंगारी, आर.आर. बोकडे, संरक्षण अधिकारी अमित गजभिये, नितीन साठवणे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व कर्मचारी तथा तालुकास्तरावरील संरक्षण अधिकारी कार्यालयातील सहाय्यक व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बालक व स्वयंसेवी संस्थांचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

