लघु गटांकडून 150 कोटीचा प्रारुप आराखडा प्रस्तावित


भंडारा, दि.19 :- जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 साठी सर्वसाधारण योजना 86 कोटी 76 लाख, अनुसूचित जाती उपयोजना 49 कोटी 17 लाख व आदिवासी उपयोजना 14 कोटी 16 लाख असे एकूण 150 कोटी 9 लाख रुपयांचा प्रारुप आराखडा लघुगटांकडून प्रस्तावित करण्यात आला. आमदार राजेश काशिवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज लघुगटांची बैठक घेण्यात आली. याबैठकीत हा आराखडा प्रस्तावित करण्यात आला. जिल्हाधिकारी सुहास दिवसे, सहाय्यक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूरचे सदस्य डॉ. कपिल चंद्रायन व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्रीमती जया यशवंत सोनकुसरे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आमदार राजेश काशिवार म्हणाले की, कोल्हापूरी बंधाऱ्याच्या बांधकाम दुरुस्तीसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीतून साईट उपलब्ध असल्यास नवीन कोल्हापूरी बंधाऱ्याचे बांधकाम प्रस्तावित करण्यात यावेत. प्रस्तावित आराखडयात अंगणवाडी बांधकाम, शौचालय व अंगणवाडी दुरुस्ती यासाठी निधी प्रस्तावित आहे. जिल्हयातील 23 पुनर्वसित गावात प्राधान्याने अंगणवाडी बांधकाम घ्यावे, असे त्यांनी सांगितले. शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांची अवस्था चांगली नसून या खोल्यांचे बांधकाम करणे आवश्यक आहे. जिल्हयातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची सद्यस्थिती यावर शिक्षण विभागाने पालकमंत्री यांचे समोर सादरीकरण करावे, असे काशिवार यांनी सांगितले. या कामासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
यासोबतच आरोग्य व जनसुविधा या क्षेत्राच्या विकासासाठी सुध्दा अतिरिक्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. अपारंपारीक ऊर्जा विकासासाठी असलेल्या तरतूदीमधून न्यायालय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, क्रीडा संकुल व कारागृह इमारत टप्प्याटप्याने सौर उर्जेवर आणण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. प्रस्तावित आराखडयात जिल्हा कारागृहात कैदयांची नातेवाईकांसोबत भेटीसाठी विशेष सुरक्षित कक्ष बनविणे प्रस्तावित आहे. कारागृहात असलेल्या नक्षल कैदयांसाठी वेगळी व्यवस्था निर्माण करण्याचे नियोजित आहे. दुग्ध उत्पादन, रेशिम उत्पादन, मत्स्य व्यवसाय, जनसुविधा, आरोग्य व शिक्षण या 6 क्षेत्रात प्राधान्याने काम करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या क्षेत्राचा विकास डोळयासमोर ठेवून प्रत्येक विभागाने नियोजन करावे, असे ते म्हणाले. या बैठकीत कौशल्य, विकास, क्रीडा विकास, मागासवर्गीयांचे कल्याण, तांडा विकास, पेयजल आणि पाणीपुरवठा, नगरविकास, जलयुक्त शिवार, वन व वन्यजीव, पूरनियंत्रण, भंडारा शहरातील सिंग्नल तसेच सीसीटिव्ही आदी विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती सदस्या जया सोनकुसरे यांनी गणेशपूर ग्रामपंचायतमध्ये जागा उपलध असून त्या ठिकाणी तालुका क्रीडा सकुलाची मागणी उपस्थित केली. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी भेट देवून पाहणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या. बैठकीचे संचलन जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post