वाहन चोरट्यांच्या कुख्यात आंतरराज्यीय टोळीस अटक


आर्णीतून 35 दुचाकी जप्त
यवतमाळ(प्रतिनिधी) :  स्थानिक गुन्हे शाखेच्या टोळीविरेाधी पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार आर्णी येथे संशयीत इसमांवर धाड घालून वाहनचोरी करणाऱ्या कुख्यात आंतराज्यीय टोळीला गजाआड केले असून या टोळीकडून  त्यांनी चोरलेल्या तब्बल 35 मोटरसायकली जप्त करण्यात यश मिळविले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिक्षिक संतोष मनवर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार आर्णी येथे काही संशयीत चोरीच्या मोटर सायकली विकण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली. त्वरीत मनवर यांनी आपल्या पथकासह आर्णी गाठले. कंबलपोष बाबाच्या दर्गाहजवळील माहुरकडे जाणाऱ्या मार्गावर हे पथक पोहचले.

 त्या ठिकाणी दोन मोटर सायकलीवर डबलसीट बसलेले संशयीत इसम आढळून आले. या चारही संशयीत इसमांकडे चौकशी केली असता हिरोहोंडा प्लेंडरवरील इसमाने त्याचे नाव शामराव उर्फ शाम वसंता ढगे (24) रा. गंगा नगर ता.किनवट व मागे बसलेला इसम गोकुंदा गावचा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे सांगीतले. दुसऱ्या वाहनावर हिरोहोंडा पॅशनवर असलेल्या इसमाने याचे नाव सैय्यद फिरोज सै.नुसरत अली रा. शास्त्री नगर आर्णी व मागे बसलेला अब्दुल कादर मो. इक्बाल धारीवाला (32) रा शास्त्री नगर आर्णी अशी माहिती दिली.

 त्यांना वाहनाचे कागदपत्र मागीतले असता कागदपत्र नसल्याचे सांगीतले त्यामुळे या चारही लोकांना या पथकाने कसुन विचारपुस केली असता माहिती पडली की त्यांच्या जवळील एमएच 29 वाय 5110 ही मोटर सायकल त्यांनी 2015 मध्ये आर्णीच्या शिवाजी नगर भागातील घराच्या आवारातून गेटचे कुलूप उघडून पोर्चमधून चोरली होती. मुळ वाहन क्रमांक बदलवून नविन क्रमांक टाकला होता. तसेच दुसरे त्यांचे जवळील वाहन हे सुद्धा चोरीचे असल्याचे समजले. दोन्ही वाहनाचे नंबर बदलविले होते. या चारही लोकांना आर्णी पो.स्टे.ला आणून त्यांचे विरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या चारही आरोपींनी आतापर्यंत यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, वर्धा, परभणी तसेच तेलंगणामधील अदीलाबाद जिल्ह्यातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. आर्णीच्या शास्त्री नगर येथील सैय्यद फिरोज नुसरत अली याचे घराचे बाजुला चोरलेल्या मोटर सायकली लपवून ठेवल्याचे सांगीतले. त्या ठिकाणी पथकाने जावून पंचासमक्ष हिरोहोंडा पॅशन, बजाज डिस्कवर, यामाहा, होंडा शाइन, बजाज पल्सर, बजाज बॉक्सर, हिरोहोंडा स्प्लेंडर अशा विविध कंपनीच्या चोरलेल्या 35 मोटर सायकली जप्त केल्या. याची किंमत 13 लाख 60 हजार रुपये एवढी आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ही कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव, पेालीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा मुकूंद कुळकर्णी, यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकुर, संजु दुबे, योगेश गटलेवार, गणेश देवतळे, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशीष गुल्हाने, विनोद राठोड, प्रविण मेंगरे, आकाश सहारे, श्रीधर शिंदे, जयंत शिंदे, शशिकांत चांदेकर, यशवंत जाधव, राहुल दुकंडवार, गौरव ठाकरे, राजकुमार कांबळे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post