'लोकेशन' बंद ठेवले तरी गुगलची तुमच्यावर नजर


अमेरिका :- तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर सावधान! तुम्ही कुठे जाता, काय करता या सगळ्यावरच गुगलची नजर आहे. तुम्ही मोबाइलचं लोकेशन फिचर आणि इंटरनेट बंद केलं असलं तरीसुद्धा तुम्ही कुठे आहात हे गुगलला कळू शकतं.

अॅंड्रॉइड मोबाइलमधील गुगल लोकेशन या फिचरवर नुकतंच अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठात संशोधन करण्यात आलं. या संशोधनातून हे स्पष्ट झालंय की मोबाइलमधील लोकेशन फिचर, इंटरनेट बंद केलं तरी एखाद्या व्यक्तीचं लोकेशन, त्याच्या हालचाली याची माहिती गुगलला मिळू शकते. मोबाइलमधील इतर अॅप्सच्या मदतीने ही माहिती गुगलपर्यंत पोहोचते. गुगलनं स्वत:च्या सपोर्ट पेजवरही हे स्पष्ट केलं आहे. तसंच, गुगलच्या प्रवक्त्यांनीही यास दुजोरा दिला आहे.

ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी ही नोंद ठेवली जाते, असं गुगलचं म्हणणं आहे. तर, दुसरीकडं प्रिन्सटन विद्यापीठातील प्राध्यापकांनी लोक कुठे जातात, काय करतात याची नोंद ठेवणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. 'लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात याच्याशी गुगलला काही घेणंदेणं नाही. त्यांच्या सर्व हालचालींवर नजर ठेवणं हे त्यांच्या गोपनीयतेच्या हक्कांचं उल्लंघन आहे,' असं या प्राध्यापकांचं म्हणणं आहे.

लोकेशन फिचर बंद ठेवता येण्याबरोबरच लोकेशन हिस्ट्री डिलीट करण्याची सुविधाही गुगलनं द्यावी, अशी मागणी आता केली जात आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post