सातारा :- शासन सेवेतील सफाई कामगार हा शेवटचा घटक आहे. या घटकांसाठी राज्य तसेच केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंलबजावणी करुन सफाई कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के हाथीबेड जी यांनी आज केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, सफाई कामगारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना सुरु करण्यात आली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रत्येक सहा महिन्यातून एकदा सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवरच ज्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा 50 वर्ष झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांना शासनामार्फ मोफत घरे बांधुन दिले जाणार आहे. ज्या ठेकेदाराने सफाईचे काम घेतले आहे अशा ठेकेदारांनी साफाई कामगारांना त्यांना सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. यासाठी त्यांना लागणारे हात मोजे तसेच त्यांना पोशाख उपलब्ध करुन देण्याच्या सूचना बैठकीत दिल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सफाई कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिबीरांचे आयोजन करावे त्याद्वारे त्यांना आरोग्या विषयी जागृत करावे. त्यामुळे त्यांच्यात स्वत: आरोग्य विषयी जागृती निर्माण होईल याबाबत सर्व मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सफाई कामगार हा स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून पूर्ण समाजाचे आरोग्य चांगले रहावे म्हणून ते काम करत असतात. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदलला पाहिजे. त्यांनाही आता समाजात सन्मानाची वागणुक दिली पाहिजे, यासाठी त्यांना असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी शेवटी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेपूर्वी भारत सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के हाथीबेड जी यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी समजून घेवून त्या सोडविण्याविषयी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. येत्या नोव्हेंबर मध्ये पुन्हा पुणे येथे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.