... तर बेकायदा बांधकाम तात्काळ पाडा: HC


रिज़वान टाइम्स विशेष प्रतिनिधी, मुंबई :- सांताक्रूझ पश्चिमेकडील खोतवाडीमध्ये मित्र मंडळ रोडवरील कटाळे चाळीच्या ठिकाणी जाऊन बांधकामाची तपासणी करा आणि हे बांधकाम बेकायदा असल्याचे आढळल्यास ते तात्काळ पाडण्याची कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई महापालिकेला दिले. भाजपच्या स्थानिक नगरसेविका हेतल गाला यांच्या वरदहस्ताने हे बेकायदा बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

'खोतवाडीमध्ये साईनाथ मंदिरच्या मागे आणि लीओ अँथनी हाऊसच्या समोर कटाळे चाळीचे बेकायदा बांधकाम करण्यात येत आहे. याच ठिकाणी पूर्वी बांधण्यात आलेल्या बेकायदा चाळीवर महापालिकेनेच कारवाई करत ती जमीनदोस्त केली होती. त्यानंतर अनेक वर्षे हा भूखंड मोकळा होता.

मात्र, आता स्थानिक नगरसेविका हेतल गाला यांच्या वरदहस्ताने १० जूनपासून अचानक बेकायदा बांधकाम सुरू करण्यात आले आहे. रात्रंदिवस काम करत चाळीच्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत. याविषयी महापालिकेकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

हे बांधकाम पालिकेच्या परवानगीने झाले आहे का, अशी विचारणा केली असता पालिकेकडून नकारार्थी उत्तर मिळत आहे', असे निदर्शनास आणणारी रिट याचिका राजीवकुमार सिंग यांनी अॅड. एस. पी. श्रीवास्तव यांच्यामार्फत केली आहे. जॉन कार्लोस यांच्या लीओ अँथनी हाऊसच्या समोरच हे बेकायदा बांधकाम सुरू असल्याने त्यांनी यासंदर्भात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्याकडे ११ जूनला तक्रार केली, तर आपले वडील ओमप्रकाश सिंग यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तरीही कारवाई होत नसल्याने नाईलाजास्तव न्यायालयाचे दार ठोठवावे लागत आहे, असे म्हणणेही सिंग यांनी याचिकेत मांडले. पूर्वी मोकळा असलेला भूखंड आणि आता सुरू असलेले बेकायदा बांधकाम याविषयीचे फोटोही याचिकादारांतर्फे बुधवारी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणण्यात आले.

त्यामुळे पालिकेच्या संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत ते परवानगीप्रमाणे सुरू आहे का याची खातरजमा करावी आणि बांधकाम बेकायदा असल्यास त्वरित तोडकाम कारवाई करावी. त्यासाठी आवश्यकता भासल्यास पोलिस बळाचे सहाय्य घ्यावे, असे आदेश खंडपीठाने दिले. तसेच याविषयीचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी काही आठवड्यांनी ठेवली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post