- कृषी उत्पन बाजार समिती, विधानसभेसाठी टाकल्या सोंगट्या.....
सोलापूर (अजित उंब्रजकर)
दक्षिण तालुक्यात बाजार समितीबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील कट्टर प्रतिस्पर्धी सहकारमंत्री श्री. सुभाष देशमुख आणि माजी आ.श्री. दिलीप माने एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता मा.आ.श्री. दिलीप माने यांनी सहकारमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी दस्तुरखुद्द माजी गृहमंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे यांच्या खाद्यांवरच बंदूक ठेवत श्री. सुभाष देशमुखांवर निशाना साधाला आहे. आ. प्रणिती शिंदे यांच्याबद्दल बोललेल्या व्यक्तव्याच्या निषेधाचे कारण पुढे करत श्री.माने यांनी श्री.शिंदे यांच्यावर निष्ठा दाखवत सहकारमंत्र्यांवर आरोपांच्या फौरी झाडल्या आहेत. आगामी बाजार समिती आणि त्या पाठोपाठ विधानसभा जिंकण्यासाठी मा.आ.श्री.माने यांची ही खेळी असल्याची मोठी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.सन 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मा.आ.श्री.दिलीप माने यांना श्री. सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामागे अनेक कारणे होती.श्री. माने यांचा थेट वरिष्ठ पातळीवरचा संबंध माजी गृहमंत्री श्री. शिंदे यांना खटकत असल्याने त्यांनीच श्री.सुरेश हसापुरे, श्री.बाळासाहेब शेळके यांना श्री.माने यांच्या विरोधात उभे केल्याची आणि आतून श्री. सुभाष देशमुख यांना मदत केल्याची चर्चा आजही तालुक्यातील प्रत्येक कट्ट्यावर चवीने रंगते. आता आगामी निवडणुकीतही ही परिस्थिती येऊ नये, यासाठी माजी आ.श्री. दिलीप मानेही डाव पाहून सोंगट्या टाकत आहेत. आगामी बाजार समिती निवडणूक जिंकण्यासाठी श्री.शिंदे यांनी तालुक्यातील सर्व काँग्रेस नेत्यांना एकत्र आणले आहे. ही एकी शेवटपर्यंत राहिल्यावरच काँग्रेसला बाजार समिती निवडणूक सोपी जाणार आहे. ही एकी टिकवण्यासाठी श्री.शिंदे साहेबांची गरजही लागणार आहे. त्यासाठी श्री.शिंदे यांच्या आणखी मर्जीत जाण्यासाठी माजी आ. श्री.माने यांनी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत सहकार मंत्री श्री सुभाष देशमुखांची सर्व प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. आमदार प्रणितीताई शिंदे या आमच्या नेत्याच्या कन्या आहेत, त्यांच्याबद्दल बोललेले आम्ही खपूवन घेणार नाही, असे सांगत मा.आ.श्री.दिलीप माने यांनी श्री. सुशीलकुमार शिंदे यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. श्री.दिलीम मानेंची ही खेळी म्हणजे आगामी बाजार समिती आणि त्या पाठोपाठ विधानसभा जिंकण्यासाठीच टाकलेल्या सोंगट्या आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता सहकारमंत्री श्री.सुभाष देशमुख श्री.दिलीप माने यांनी टाकलेल्या सोंगट्यांचा सामना कसा करतात आणि कोणती नवी चाल खेळतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
बोलले एकाने फायदा दुसर्याला
सोलापूरच्या राजकारणात 2004 मध्ये सुभाष आणि शिंदे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोरासमोर आले होते. यावेळी उज्ज्वला शिंदे आणि सुभाष देशमुख यांच्यात लढत झाली होती. यात देशमुख यांचा विजय झाला होता. मात्र त्यांनतर 10 ते 12 वर्षात शिंदे आणि देशमुख यांनी कधीही एकमेकांवर राजकीय शेरेबाजी केली नाही. दोघांनी एकमेकांना अॅडजेस्ट राजकारणच केल्याचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते खासगीत बोलतात. मात्र आता पुन्हा एकदा शिंदे आणि देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापत आहे. त्याचा फायदाही अनेकांनी घेण्यास सुरूवात केल्याची चर्चा रंगली आहे.