सायबर क्षेत्रातील वाईट प्रवृत्तीपासून सावध रहा - विनीता साहू

• स्टेटस् काळजीपूर्वक टाका
• वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवा
• इंटरनेट बँकेचा वापर जपून करा 
• युवक व माध्यमासाठी कार्यशाळा

भंडारा, दि.17 :- आजचे युग इंटरनेट व स्मार्ट फोनचे आहे. आपले सगळे व्यवहार व संवाद इंटरनेटच्या उपयोगाने व्यापले आहे. अशा परिस्थितीत सायबर जगात चांगल्या व्यक्तीसोबत वाईट प्रवृत्तीसुध्दा मोठया प्रमाणात सक्रीय आहेत. केवळ आर्थिकच नाही तर भावनिक, सामाजिक व नात्यांची फसवणूक सायबर क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढली आहे. इंटरनेटच्या मायाजाळात वावरतांना सायबर क्षेत्रातील वाईट प्रवृत्तीपासून सावध रहा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी केले. ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत भंडारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्हयांविषयी जनजागृती या विषयावर युवक-युवती, माध्यम प्रतिनिधी व पालक यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या. अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, उपअधिक्षक गृह सुनिल कुळकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, आयसीआयसी बँक व्यवस्थापक कमलेश वालदे व सायबर तज्ञ मुकेश कवटघरे, पोलीस निरिक्षक सुरेश धुसर, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रमोद रहांगडाले यावेळी उपस्थित होते. 
हातात स्मार्ट फोन आल्यामुळे सोशल मिडियाचा वापर अधिक झाला आहे. आर्थिक व्यवहारासोबतच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मोबाईलचा वापर होत आहे. मात्र हा वापर करतांना आपण बऱ्याच वेळी काळजी घेत नाही. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे विनीता साहू यांनी सांगितले. व्हॉटस्ॲप, व्टिटर, फेसबुक या सारख्या समाज माध्यमावर आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्र, स्टेटस् टाकतांना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: महिला व मुलींनी या विषयी अधिक काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. समाज माध्यमावर वावरतांना अनोळखी माणसांपासून सावध राहणे गरजेचे आहे. समाज माध्यमावर अनेक सायबर गुन्हेगार खोटे प्रोफाईल बनवून धोका देण्याचे काम करीत असतात त्यामुळे खात्री असल्याशिवाय कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका, असा सल्ला साहू यांनी दिला
. प्रसार माध्यमांनी याबाबत जाणिव जागृती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सायबर क्षेत्रातील आर्थिक फसवणूकीच्या घटनांमध्ये इतर राज्यातील गुन्हेगार मोठया प्रमाणात असून अनोळखी कॉलला आपली कुठलीही माहिती शेअर करु नका, असे त्या म्हणाल्या. इतरांसोबत घडलेला सायबर गुन्हा माझ्यासोबत घडणार नाही. ही धारणा न ठेवता सोशल मिडियाचा गैरवापर टाळा, खात्रीविना कोणतेही मॅसेज किंवा पोस्ट इतरांना प्रसारित करु नका. आक्षेपार्ह पोस्ट तात्काळ डिलीट करा, आमिषाला बळी पडू नका असे सांगून सतत सजग रहा, सावध रहा व काळजीपूर्वक व्यवहार करा, असे आवाहन साहू यांनी केले. सुरक्षित बँक व्यवहाराविषयी आयसीआयसी बँक नागपूरचे व्यवस्थापक कमलेश वालदे यांनी उपयुक्त माहिती दिली. कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीकडून आलेल्या ई-मेलवर क्लिक करु नका, आपला गोपनीय डाटा शेअर करु नका, पासवर्ड व पीन कुणालाही देवू नका, बँक डिटेल्स देवू नका, एटीएम व्यवहार काळजीपूर्वक करा, असे ते म्हणाले. क्रेडिट व डेबीट कार्ड स्वाईप करण्यासाठी कुणाकडेही देवू नका. त्याचप्रमाणे स्वत:ची व बँकेबाबतची माहिती सोशल साईटवर शेअर करु नका, असे त्यांनी सांगितले. सायबर गुन्हेगार या माहितीचा आधार घेवून आपल्या खात्यातील रक्कम लंपास करण्याचे काम करीत असतात. तेव्हा काळजीपूर्वक व्यवहार करा, असा सल्ला त्यांनी दिला.सायबर फॉरेन्सिक आणि सायबर क्राईम याबाबत मुकेश कवटघरे यांनी मार्गदर्शन केले. संगणक हॅकर आपली गोपनीय माहिती हॅक करुन आर्थिक फसवणूक करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल किंवा संगणकावरुन सुरक्षित साईटलाच व्हिजीट करावी. ऑनलाईन शॉपींग करतांना सुरुक्षित संकेतस्थळाचा वापर करावा, असे ते म्हणाले. सोशल मिडियावरुन शेअर केलेले मॅसेज केव्हाही रिकव्हर केले जातात. आपण पोस्ट केलेला आक्षेपार्ह मॅसेज नंतर सापडणार नाही या भ्रमात राहू नका. तो केव्हाही रिकव्हर केला जाऊ शकतो त्यामुळे याबाबींपासून दूर रहा, असा सल्ला त्यांनी दिला. समाज माध्यमातील चुकीच्या प्रवृत्तीला तसेच आमिषाला बळी पडून आपले नुकसान करुन घेऊ नका, असे ते म्हणाले.सायबर गुन्हांबाबत जनजागृती अभियानांविषयी कार्यशाळेचे प्रास्ताविक अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर यांनी केले. सोशल मिडिया तसेच इंटरनेटचा वापर संयमाने व जपून करावा, असे त्या म्हणाल्या. सायबर गुन्हयांचे प्रमाण वाढत असून यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी तसेच जागृत करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेस विद्यार्थी, पत्रकार व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post