इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीबरोबर कृत्रिम पध्दतीने अधिक तंत्रज्ञानावर आधारीत शेती करण्यावर सध्या शेतकऱ्यांचा भर असल्याने शेतीतून उत्पादन वाढावे याकरिता मोठया प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा बेसुमार वापर केला जात आहे.यामुळे माणसाच्या आहारात व आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहेत.यातून बाहेर पडावयाचे असेल तर नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन एक शाश्वतशेती हा पर्याय होऊ शकेल याकरिता शेतीच्या सर्वांगीण विकासात लोकसहभाग महत्वाचा असून शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लातूरचे माजी ज्येष्ठ संशोधन सहाय्यक आ.ना.जाधव यांनी केले. मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात दि.19 जुलै रोजी 'शेतकरी मेळावा' स्मार्ट परिवार एन्टरप्राईजेस प्रा.लि.,उमरगा व ज्येष्ठ शेतीनिष्ठ शेतकरी रमेश बसप्पा माळगे(गुरुजी)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे होते.या वेळी प्रमुख म्हणुन तुळजापूरचे मृद विज्ञान विभागाचे तज्ञ डॉ. भगवान अरबाड,स्मार्ट परिवाराचे संचालक शिवशंकर सुर्यवंशी,भाग्यश्री साखरे,गर्जे,उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार,नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे,सुरेश शेळके, विजयालक्ष्मी भालेराव,बसप्पा माळगे(गुरुजी)आदी,उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जाधव म्हणाले की,शेतजमीनीचे आरोग्य सुधरावयाचे असेल तर शेतीचा पत,मातीचे परीक्षण करुन सेंद्रिय गर्भ एक टक्यांपर्यत आणणे आवश्यक आहे.सध्याची पीक पध्दत बदलणे,मिश्र पद्धतीने पिकांची लागवड करणे,एकात्मिक कीड नियंत्रण पध्दती राबविणे,सेंद्रिय पध्दतीने बी-बियानांची लागवड करुन शेतकरी स्वावलंबी बनला पाहिजे असे सांगीतले.यावेळी डॉ.अरबाड यांनी जैविक शेतीवर भर देवून वाढता रासायनिक खताचा वापर हा निसर्ग व मानव जातीला लागलेला महारोग असल्याचे मनोगतात म्हटले.या वेळी बसप्पा माळगे,शरणाप्पा मंगरुळे,विठ्ठलराव पाटील या शेतकरी बांधवांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ अशोक सपाटे यांनी विष मुक्त शेती करण्याकरिता सर्व शेतकरी बांधवांनी लोक सहभागातून ही चळवळ अधिक वाढविणे गरजेचे आहे.असे सांगीतले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप शेळके,व्यंकट बिराजदार,श्रेणिक कौलकर,रवि अंबुसे,प्रा.डॉ.महेश मोटे,सुर्यकांत विभुते, सुजित शेळके,महादेव लामजने,संजय लादे,महादेव घाळे,चंद्रकांत सोबाजी,श्रावण कोकणे आदींनी पुढाकार परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर सुर्यवंशी व सूत्रसंचालन प्रा.डॉ.नागोराव बोईनवाड यांनी केले तर आभार भाग्यश्री साखरे यांनी मानले.या कार्यक्रमास मुरुम शहर व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
