चंद्रपूर, दि.19 जानेवारी- शेती, शेतकरी, शेतमालाची विक्री, शेतीचे तंत्रज्ञान, सेंद्रीय शेती, शेतीतील जलव्यवस्थापन अशा विविध आघाडयांवर मार्गदर्शन आणि या व्यवसायाशी नाळ जुळलेल्या बचत गटांच्या प्रदर्शनी व विक्रीचा गेल्या पाच दिवसाच्या सोहळयाचा शानदार समारोप शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता चांदा क्लब मैदानावर झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी बचत गटांच्या स्टॉलला भेट देवून व्यक्तिगतरित्या चौकशी केली. तर समारोपाच्या सत्रात उत्तम मार्केटींग व्यवस्थेसाठी बचत गटांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी महोत्सव, सेंद्रीय शेतमाल विक्री, महिला बचत गट मेळावा व मार्गदर्शन सत्रांचा एकत्रित आयोजन 15 जानेवारीपासून चांदा क्लब ग्रांऊडवर सुरु होते. चंद्रपूर शहर व जिल्हयातील नागरिकांनी या मेळाव्याला उत्तम प्रतिसाद दिला. वेगवेगळया विभागांच्या कृषी संबंधीत उपक्रमांना जोडून जल, जमीन, जंगलशी संबंधीत योजना, उपक्रम एकत्रित मांडण्यासाठी एकत्रित आयोजन करण्यात आले होते. त्याला योग्य प्रतिसाद जिल्हाभरातून मिळाला असून या वर्षी विक्रमी 41.46 लक्ष रुपयांची विक्री झाली आहे. यामध्ये बचत गटांच्या विक्रीचा आकडा 22 लाखावर असून शेतीमधील उत्पादनाचा विक्री आकडा 19.46 लाख आहे. या ठिकाणी विविध यंत्रणेसोबत मोठया प्रमाणात खरेदी विक्रीचे परस्पर करार झाले. पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे आयोजन 52 हजार चौ.फुटाच्या भव्यतेत चांदा क्लबवर करण्यात आले होते. या ठिकाणी 260 विविध स्टॉल लावण्यात आले होते. वेगवेगळे मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे सकाळी 9 ते रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी नागरिकांनी, शेतक-यांनी गर्दी केली होती. जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीसह शेतीसंबंधीत लिखीत व यांत्रिक माहिती मोठया प्रमाणात देण्यात आली.समारोपाच्या सत्राला मार्गदर्शन करण्यापूर्वी विक्रमी विक्री करणा-या बचत गटांच्या कौतुकासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेळ दिला. त्यांनी बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तू मागील कौशल्य जाणून घेतले. अनेकांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवला. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यामुळे प्रदर्शनीतील प्रत्येक स्टॉलवरील बचत गटांच्या सदस्यांना आनंद झाला. यावेळी त्यांनी सेंद्रीय शेतीत तयार झालेला तांदुळ व त्याची प्रतवारी जाणून घेतली. तर लाकडांपासून विविध कलाकृती साकारणा-या कलाकाराच्या संसदेच्या प्रतिकृतीजवळ बराच वेळ घालवला. समारोपाच्या कार्यक्रमात या कलाकारांचे आवर्जून कौतुक करतांना त्यांनी उपस्थित अधिका-यांनी आता योग्य मार्केटिंगसाठी बचत गटांना मदत करावी, असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी वेगवेगळया विभागांच्या शेतीसंबंधीत उपक्रमांना एकत्रित आणत एक मोठा कार्यक्रम जिल्हयामध्ये संयुक्तरित्या राबविल्याबद्दल अधिका-यांचे कौतुक केले. आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.विद्या मानकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रविंद्र शिवदास यांच्या नेतृत्वात सर्व विभागांनी केलेल्या उत्तम समन्वयाचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी घेणा-या प्रकल्प संचालक विद्या मानकर यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करतांना जिल्हयातील शेतक-यांनी बचत गटांनी मोठया संख्येने दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. पाच दिवस जिल्हा प्रशासनातील विविध विभागाने समन्वयाने हा मोठा महोत्सव साजरा केला. यामध्ये विक्रमी विक्री झाली. याबद्दल समाधान व्यक्त केले. सर्व विभागाच्या सहभागी अधिका-यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी व्यासपिठावर उपमहापौर अनिल फुलझले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ए.हसनाबादे, उपसंचालक रविंद्र मनोहरे, अशोक मगर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सचिन देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले.
उत्कृष्ठ शेतक-यांना मिळाले पुरस्कार पाच दिवसाच्या आयोजनानंतर विविध क्षेत्रामध्ये काम करणा-या शेतक-यांना नगदी बक्षिस व सन्मानपत्र बहाल करण्यात आले. यामध्ये वरोरा येथील कृषी भूषण शेतकरी मधुकर भलमे, चंद्रपूर तालुक्यातील भाजीपाला व दुग्ध व्यवसायासाठी वैभवी खाडीलकर, मूल तालुक्यातील कुक्कुट पालनासाठी प्रशांत मेश्राम, भाजीपालासाठी गिरीधर वाघाडे, प्रभाकर सोनुले, वरोरा तालुक्यातील बीपीएफ लागवड पध्दतीसाठी विनोद राऊत, हळद लागवडीसाठी विठ्ठल हटवार, मधुमक्षिका पालनासाठी रमेश चौधरी, भद्रावती तालुक्यातील रेशीम कोष उत्पादनासाठी माधव जिवतोडे, मधुमक्षिका पालनासाठी दत्तुजी येरगुडे, चिमूर तालुक्यातील कापूस उत्पादनासाठी प्रशांत हिंगे, तूर उत्पादनासाठी बंडूभाऊ बुच्चे, नागभिड तालुक्यातील सेंद्रीय शेतीसाठी फालगुन गिरडकर, तूर उत्पादनासाठी ओमप्रकाश पाथोडे, ब्रम्हपूरी तालुक्यातील श्रीपध्दत भात लागवडीसाठी राजेश्वर मगरे, लक्ष्मण कुसनकार, तूर पिक लागवडीसाठी श्रीराम देशमुख, पोंभूर्णा तालुक्यातील भाजीपाला लागवडीसाठी विजय बोडेकार, सुनिल दिवसे, सुनील सातपुते, राजूरा तालुक्यातील ग्रामीण कृषी पर्यटनासाठी सुहास आसेकर, हळद लागवडीसाठी सुलोचना बोथले, गोंडपिपरी तालुक्यातील कापूस उत्पादनासाठी सुरेश रोहणकर, भाजीपाला लागवडीसाठी राजू काळे, सुरेंद्र चोथले, बल्लारपूर तालुक्यातील हळद लागवडीसाठी अशोक मोरे, फुलशेतीसाठी प्रभाकर गडकर, भाजीपालासाठी लक्ष्मण येरगुडे यांना पुरस्कार देण्यातआले. यावेळी उत्कृष्ट शेतकरी गट पारितोषीकामध्ये वरोरा तालुक्यातील संताजी शेतकरी समूह शेतकरी गट, मेहर स्वंयस्वायत्ता बचग गट भद्रावती तालुक्यातील एकता सेद्रीय शेतीसमूह गट, चिमूर तालुक्यातील भारतमाता महिला बचत गट, ब्रम्हपूरी तालुक्यातील ओम महिला बचत स्वयस्वायता बचत गटांचा सत्कार करण्यात आला. तर उत्तम विक्रीसाठी राणी लक्ष्मीणीबाई महिला स्वयस्वायता गट चौगाण, धनश्री महिला स्वयंस्वायता गट नंदवर्धन, वैष्णवी महिला स्वयस्वायता गट चिंधीचक यांचे कौतुक करण्यात आले.


