Showing posts with label गोंदिया. Show all posts
Showing posts with label गोंदिया. Show all posts
लोकसभा पोटनिवडणूक मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी

लोकसभा पोटनिवडणूक मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी



गोंदिया,दि.20 : लोकसभा पोटनिवडणूकीसाठी येत्या 28 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज 20 मे रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय गोंदिया येथे राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्र सुस्थितीत आहेत किंवा नाही याची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
       यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) शुभांगी आंधळे, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, सालेकसा तहसिलदार प्रशांत सांगळे, आमगाव तहसिलदार साहेबराव राठोड, नायब तहसिलदार सर्वश्री सोमनाथ माळी, ओमकार ठाकरे, राजश्री मलेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी अशोक सहारे व अन्य राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आता मिळणार मताचा पुरावा जिल्हाधिकारी

आता मिळणार मताचा पुरावा जिल्हाधिकारी




  •  पहिल्यांदाच व्होटर व्हेरिफीयेबल पेपर ऑडिट ट्रेल प्रणालीचा वापर 

भंडारा,दि. 14:-  लोकसभा पोट निवडणूकीसाठी कुणाला मत दिले याची खात्री पटवून देण्यासाठी पहिल्यांदाच व्होटर व्हेरिफीयेबल पेपर ऑडिट ट्रेल प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.  इव्हीएममध्ये हेराफेरी करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने ही उपाययोजना आणली आहे. पसंतीच्याच उमेदवाराला मत दिल्याची खात्री स्क्रीन वर बघून करता येणार असून याची अंमलबजावणी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी प्रथमच होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिली.
अभिमन्यु काळे म्हणाले की, मत कुणाला दिले याची खात्री करण्यासाठी  या निवडणूकीत व्हि.व्हि.पी.ए.टी चा वापर करण्यात येणार  आहे.  या प्रणालीत मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर नोंदविलेले मत पसंतीच्या उमेदवारांना झाले की नाही, याची पावती दिसणार आहे. उमेदवारांचे नाव, चिन्ह, यादीतील क्रमांकाचा समावेश त्यात राहणार आहे. नोंदविलेले मत पसंतीच्या उमेदवाराऐवजी अन्य उमेदवाराला मिळत असल्याचे दिसताच केंद्राध्यक्षाकडे तक्रार करता येणार आहे.
 सात सेकंदानंतर प्रिंट झालेली पावती प्रिंटरला जोडलेल्या सिलबंद बॉक्समध्ये आपोआपच जमा होईल. ही मते मुद्रित स्वरुपात ठेवण्याची व्यवस्था असणार आहे. या नव्या प्रणालीसंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले असून या नव्या यंत्रणेमुळे हेराफेरीवर आळा घालण्यास मदत होणार आहे. या प्रणालीमुळे मतदारांमधील संभ्रम दूर होणार असून या निवडणूकीमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील मतदारांना याचा   वापर करता येईल.
 भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील सर्वच विधान सभा क्षेत्रात ईव्हीएम मशिन सोबत व्हिव्हिपॅटचा वापर प्रथमच केला जाणार आहे. या मशिनच्या वापराबाबत मतदारांमध्ये उत्सुकता असून सर्वच क्षेत्रिय अधिकाऱ्यांना व्हिव्हिपॅटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नागरिकांना व मतदारांना व्हिव्हिपॅटचा डेमो पाहण्याची सोय केली आहे. व्हिव्हिपॅटमुळे आपले मत नक्की कुठल्या उमेदवाराला गेले याची खात्री  मतदार करु शकतो. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी दोन्ही जिल्हयात जनजागृती अभियान राबविले जात आहे. ईव्हीएम व व्हिव्हिपॅटच्या वापरासंबंधीची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. 
निवडणूक निरिक्षकांनी घेतला लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

निवडणूक निरिक्षकांनी घेतला लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा



• आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा
• मतदार जागृती वर भर द्या
• रोख व मद्य वाहतूकीवर आळा घाला

भंडारा :- भंडारा गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीमध्ये प्रथमच ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. याबाबत मतदारांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विशेष मतदार जागृती मोहीम राबवावी. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था, रोख व मद्य वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या सभा बैठकीचे रेकॉर्डिंग करण्याच्या सूचना निवडणूक निरिक्षकानी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा निवडणूक निरिक्षक यांनी घेतला.
  यावेळी निवडणूक निरिक्षक एन. बी. उपाध्याय, तेजप्रताप सिंग फुल्का, शफु-उल हक, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक विनिता साहू, डॉ. दिलीप भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आचार संहिता, मतदार याद्या प्रसिध्द करणे निवडणूक साहित्य छपाई, मतदार जागृती कार्यक्रम, उमेदवारांचा खर्च, राजकीय पक्षांचा खर्च, वाहन परवाने, कायदा व सुव्यवस्था, नाकाबंदी, मद्य व रोख वाहतूकीला आळा आणि  मतदानाची तयारी आदी विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत प्रत्येक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे तयारीचा आढावा सादर केला.
सर्व राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या सभा आणि कॅार्नर सभाचे चित्रीकरण करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. व्हिडिओ पथक व भरारी पथकांना सक्रीय ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विविध मार्गाने येणाऱ्या मद्य वाहतूकीवर उत्पादन शुल्क विभागाने पायबंद घालावा, असे निर्देश देण्यात आले. निवडणूकीच्या निमित्ताने इतर जिल्हयातून येणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यात यावी. संशयीत आढळल्यास तात्काळ तपासणी करावी. परवानाधारक शस्त्र तातडीने जमा करण्यात यावे.
या निवडणूकीत प्रथमच व्हिव्हिपॅटचा उपयोग होत असून या विषयी लोकांना माहिती व्हावी म्हणून जागृती अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदार जागृती व मतदान वाढविणे यासाठी माहिती, शिक्षण व संवाद मोहिम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात यावी. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेच्या कामावर कार्यरत मजूरांना सुध्दा मतदानाचे महत्व समजावून सांगावे, असे सांगण्यात आले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात.
यावेळी पोलीस अधिक्षक विनीता साहू व पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ यांनी कायदा व सुव्यवस्थेचे सादरीकरण केले. मतदान व मतमोजणीसाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त आराखडा तयार केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. आचार संहिता भंगाची तक्रार प्राप्त होताच तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. विविध ठिकाणी चेक पोस्ट स्थापन करण्यात आले असून रोख वाहतूक व मद्य वाहतुकीवर पोलीस विभागाची करडी नजर असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन वर्षात नवेगावबांधचा कायापालट करणार - राजकुमार बडोले

दोन वर्षात नवेगावबांधचा कायापालट करणार - राजकुमार बडोले



  • नवेगावबांध येथे बालोद्यानाचे भूमीपजून
गोंदिया,दि.21 : नवेगावबांध जलाशय परिसराचा सन 1971 ते 1991 हा काळ उत्कर्षाचा होता. त्यानंतर या परिसराच्या अधोगतीला सुरुवात झाली. नैसर्गीकदृष्ट्या संपन्न असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत आणि जास्तीत जास्त स्थानिकांना यामधून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. येत्या दोन वर्षात नवेगावबांध जलाशय परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट करण्यात येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
21 जानेवारी रोजी नवेगावबांध जलाशयाजवळ बालोद्यान तयार करणे, चौकीदार कक्ष आणि बालोद्यानासमोर सौर ऊर्जा लाईट लावण्याच्या कामाचे भूमीपूजन श्री.बडोले यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, सडक/अर्जुनी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, सडक/अर्जुनीच्या माजी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, अर्चना राऊत, माजी जि.प.सदस्य रामदास कोहारकर, श्रीमती विजया कापगते, नवेगावबांधचे सरपंच अनिरुध्द शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, केवलराम पुस्तोडे, लायकराम भेंडारकर, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास बोरकर, नवेगावबांध फाउंडेशनचे अध्यक्ष विजय डोये, नितीन गुगलिया, नवल चांडक यांची उपस्थिती होती.

श्री.बडोले म्हणाले, नवेगावबांध पर्यटनस्थळाची ओळख देशपातळीवर होईल अशा पध्दतीने विकसीत करण्यात येईल. 10 पट पर्यटक जास्त येतील यादृष्टीकोनातून इथला विकास करण्यात येईल. या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी 50 कोटी रुपये देण्याचे तत्वता मान्य केले आहे. लवकरच याला मंजूरी देण्यात येईल. 80 लक्ष रुपये खर्चातून झिप लाईन सुरु करण्यात येईल. पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टचे बांधकाम पुर्णत्वास येत आहे. 25 लक्ष रुपयातून स्टेप गार्डन आणि 60 लक्ष रुपयांच्या निधीतून दुसऱ्या बाजूच्या बीचचे काम सुरु करण्यात येईल. संजय कुटीपर्यंत पर्यटकांसाठी मिनी ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.श्रीमती गहाणे, रामदास बोरकर यांची समायोचित भाषणे झाली. यावेळी नवेगावबांध येथील ग्रामस्थ तसेच पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच अनिरुध्द शहारे यांनी केले. उपस्थितांचे आभार उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांनी मानले.