यवतमाळ(प्रतिनिधी) :- अध्यात्मिक गुरु यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरातील रहिवासी प्रेम साई महाराज यांनी स्पष्टपणे सांगीतले की, आपल्याकडे भाजपच्या वतीने वरिष्ठ नेते येवून गेले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात भाजपच्या वतीने लढण्यासाठी त्यांनी आपल्याला गळ घातली आहे. या संदर्भात दिल्ली येथील जेष्ठ नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेवू, आज आपण दिल्लीला जात आहोत. तेथून परत आल्यानंतर उमेदवारी बाबत मी आपणास बोलेल. असे उदगार प्रेमसाई महाराज यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काढले. यावेळी त्यांनी आपले सामाजिक काम तसेच अध्यात्मिक कार्य सुरु असल्याची माहिती दिली.
नुकत्याच मेनका गांधी आणि त्या पाठोपाठ वरुण गांधी यवतमाळात प्रेमसाई महाराज यांच्या भेटीसाठी येवून गेले. त्यानंतरच प्रेमसाई महाराज हे एकदम प्रकाश झोतात आले. त्यांनी आज पत्रकारांना बोलावून आपल्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याची माहिती दिली. दारव्हा तालुक्यातील दोन गावे आपण दत्तक घेतली असून या ठिकाणी सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही. परंतु आध्यात्मिक काम सातत्याने करीत आहे. गेल्या चार वर्षात सामाजिक कार्याच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात माझे काम सुरु असल्याचे प्रेमसाई महाराजांनी सांगीतले. अटलसेना, युवासेना स्थापन करुन सामाजिक काम अधिक वेगाने करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनेका गांधी आल्यानंतर चर्चेला चांगलेच उधाण आले होते. प्रेमसाई महाराज यांना यवतमाळ-वाशिम मतदार संघात भाजपच्या वतीने निवडणुक लढविण्याची ऑफर मनेका गांधी यांनी दिली आहे. या संदर्भात मी स्वत: कुठलाच निर्णय घेतला नाही. मी भाजपचा प्राथमिक सदस्य देखील नाही. परंतु भाजप व इतरही पक्षात आपल्याला माणणारे नेते आहेत. आपले मित्र आहेत. त्यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. आता भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले असून आपण जात आहोत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण निर्णय घेवू असेही त्यांनी पत्रकारांना सांगीतले. राजनाथ सिंग तसेच भाजपाचे जेष्ठ नेते यांच्याशी आपण जुळलो असल्याचे प्रेमसाई महाराज यांनी स्पष्ट केले. मनेका गांधी यांचेशी आपली सविस्तर राजकीय चर्चा झाल्याचे त्यांनी सांगीतले.
