इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने एका युवकाचा खून केल्याची घटना लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.या प्रकरणी तीघा जणाविरुध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील नेताजी आरगडे (वय 35) हे आपल्या कुटुंबासमावेत राहतात. नेताजी यांच्या पत्नीचे गावातील हणमंत रसाळ (वय 21) या युवकासोबत मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते.या संबंधाची माहिती झाल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांनी दोघांना समजावून सांगून ही ते ऐकत नव्हते.त्यानंतर नेताजी यांच्याबरोबर हणमंत भरत रसाळ,भरत विश्वभर रसाळ,प्रभाकर विश्वमभर रसाळ यांच्यामध्ये याच कारणावरून तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळेच नेताजी आरगडे याचा या तिघांनी मिळून खून केल्याची फिर्याद मयताचा भाऊ मनोज आरगडे यांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिली होती.त्यानुसार हणमंत रसाळ याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण मित्राच्या मदतीने नेताजी आरगडे यांचा खुन केल्याची कबुली दिली.त्यात त्याने सांगितले की,मित्र गोपाळ रसाळ, सचिन मुर्टे यांच्यासह मयत नेताजी यास पार्टी करण्यासाठी दि..29 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाटोदा (ता.उस्मानाबाद) येथील धाब्यावर जेवण करण्यासाठी घेऊन गेले.तेथे मद्यपान करून जेवण केले.गावाकडे परतत असताना नेताजी यास इंडीका कारमध्ये जबर मारहान करून मफलरने गळा आवळून खून केला.नेताजीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर लोहारा (खुर्द) जवळील ओढ्याच्या बाजूस असलेल्या गवतात प्रेत टाकून दिल्याची कबुली त्याने दिली.यावरून आरोपी हणमंत रसाळ,भरत रसाळ,प्रभाकर रसाळ यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आर.आर.धस करीत आहेत.
